सर्पदंशाने ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू
By Admin | Updated: July 26, 2016 01:21 IST2016-07-26T01:21:01+5:302016-07-26T01:21:01+5:30
धानोरा तालुक्यातील दुर्गम गाव चव्हेला येथे आत्याकडे राहून पाचव्या वर्गात जि. प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या ११ वर्षीय बालिकेला सोमवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास सर्पदंश झाला

सर्पदंशाने ११ वर्षीय बालिकेचा मृत्यू
धानोरात उपचार झाला नाही : रेफर करताना वाटेतच सोडला प्राण
धानोरा : धानोरा तालुक्यातील दुर्गम गाव चव्हेला येथे आत्याकडे राहून पाचव्या वर्गात जि. प. शाळेत शिक्षण घेणाऱ्या ११ वर्षीय बालिकेला सोमवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास सर्पदंश झाला. त्यानंतर नातेवाईकांनी सकाळी धानोरा रुग्णालय गाठले. मात्र बालिकेवर उपचार न झाल्याने तिला गडचिरोलीच्या रुग्णालयात रेफर करताना वाटेतच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १० वाजताच्या सुमारास घडली.
रेखा अवसू नरोटे (११) रा. दराची असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. रेखा नरोटे ही धानोरा तालुक्यातील दराची गावापासून ८ किमी अंतरावर असलेल्या चव्हेला येथे आपल्या आत्याकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाचव्या वर्गात शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणेच ती खाटेवर रविवारच्या रात्री झोपी गेली. परंतु सोमवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास विषारी सापाने रेखा हिला दंश केला. त्यानंतर सदर बाब कुटुुंबीयांच्या लक्षात आली. मात्र रेखा ही सुस्थितीत असल्यामुळे त्यानंतर सकाळी कुटुंबीयांनी रेखाला धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु ग्रामीण रुग्णालयात सकाळी ८ वाजता डॉक्टर हजर नव्हते. रेखाची प्रकृती अधिकच खालावत होती. त्यामुळे कुटुंबीयांनी ग्रामीण रूग्णालयाच्या वाहनाने गडचिरोली येथील रुग्णालयात रेफर करण्याचे ठरविले. त्यानंतर गडचिरोलीकडे वाहनाने रेखाला घेऊन येत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. धानोरा ग्रामीण रुग्णालयात वेळीच उपचार झाला असता तर रेखाचा जीव वाचला असता. (तालुका प्रतिनिधी)