मुस्कातील ११ शेतकरी जमीन मोबदल्यापासून वंचित
By Admin | Updated: February 25, 2016 01:22 IST2016-02-25T01:22:21+5:302016-02-25T01:22:21+5:30
येथून २० किमी अंतरावर असलेल्या मुस्का गावाला ये-जा करण्यासाठी रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तब्बल ११ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या.

मुस्कातील ११ शेतकरी जमीन मोबदल्यापासून वंचित
तीन महिन्यांपासून रक्कम पडून : एसडीओ कार्यालयात
धानोरा : येथून २० किमी अंतरावर असलेल्या मुस्का गावाला ये-जा करण्यासाठी रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तब्बल ११ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. मात्र १५ वर्षांचा कालावधी उलटूनही या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ गडचिरोलीच्या वतीने सन १०९७-९८ मध्ये मुस्का गावाच्या रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले. या कामासाठी ११ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. त्यावेळी या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी धावपळ करून मोबदल्याच्या कार्यवाहीची केली असता शासनस्तरावर याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचीही माहिती मिळाली. तेव्हा सन २००५ मध्ये सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रे गोळा करून जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनामध्ये तक्रार दाखल केली. सदर प्रकरणाची केस दाखल झाल्याला १५ वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र पीडित शेतकऱ्यांना अद्यापही जमिनीचा मोबदला मिळाला नाही.
गडचिरोली येथील उपविभागीय कार्यालयात या प्रकरणाचा २६ सप्टेंबर २०१५ रोजी अंतिम निर्णय पारित करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ गडचिरोली यांचेकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयाला २ लाख ७६ हजार ३०६ रूपयांचा धनादेश प्राप्त झाला. याला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. शेतजमीन संपादित करूनही जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने ११ शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले असल्याची माहिती पीडित शेतकरी नारायण गोविंदा कोल्हटकर यांनी लोकमतला दिली आहे. या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन ११ शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्याची रक्कम तत्काळ अदा करावी, अशी मागणी ११ शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)