चौकशीत अडकले १०७ कर्ज प्रकरणे
By Admin | Updated: March 11, 2015 00:01 IST2015-03-11T00:01:06+5:302015-03-11T00:01:06+5:30
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत विविध जिल्हा कार्यालयामार्फत यापूर्वी वाटप करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

चौकशीत अडकले १०७ कर्ज प्रकरणे
गडचिरोली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत विविध जिल्हा कार्यालयामार्फत यापूर्वी वाटप करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. त्यामुळे गडचिरोली येथील संबंधित महामंडळाच्या कार्यालयाने मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडून मंजूर करून घेतलेले १०७ कर्ज प्रकरणे अडकली आहेत. निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही कर्ज उपलब्ध झाले नसल्याने लाभार्थ्यांची प्रचंड अडचण होत आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत लघू उद्योगासाठी दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या बारा पोटजातीतील नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत पाच महिन्यांपूर्वी मादगी समाजातील नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आली. १३६ नागरिकांनी कर्ज योजनेकरिता महामंडळाच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयात अर्ज सादर केले. जिल्हा कार्यालयाने कर्ज प्रकरणाचे सदर प्रस्ताव मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविल्यानंतर छाणनीअंती मुख्य कार्यालयाने १०७ नागरिकांची कर्ज प्रकरणे मंजूर केली. मंजूर झालेल्या मादगी समाजातील नागरिकांना लघू व्यवसायासाठी प्रत्येकी ५० हजार रूपये कर्ज वितरित करणे आवश्यक आहे. मधल्या काळात निधीची अडचण होती.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांनी आपल्या कार्यकाळात नियमबाह्यरित्या कर्ज प्रकरणे निकाली काढून कर्जाचे वितरण केल्याची तक्रार एका इसमाने मुख्य कार्यालयाकडे केली. त्यामुळे जुन्या कर्ज वाटप प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी पूर्ण होईपर्यंत कर्ज मंजूर झालेल्या नव्या लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप होणार नसल्याचे महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडून लाभार्थ्यांना सांगितले जात असल्याची माहिती आहे. (स्थानिक प्रतिनिधी)