आंध्र प्रदेशातून रेल्वेने येणार १ हजार ५० मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:00:55+5:30

तेलंगणा राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे तेलंगणा राज्यातील मजूर ट्रक व इतर साधनांच्या मदतीने गडचिरोली जिल्ह्यात पोहोचले. क्रिष्णा जिल्हा आंध्रप्रदेशची राजधानी अमरावतीला लागून आहे. सदर जिल्हा गडचिरोलीपासून १ हजार पेक्षा अधिक किमी अंतरावर आहे. त्यामुळे एवढ्या दुरून वाहनाने येणे अशक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन या मजुरांना रेल्वेने पाठविले जाणार आहेत.

1,050 laborers will come from Andhra Pradesh by train | आंध्र प्रदेशातून रेल्वेने येणार १ हजार ५० मजूर

आंध्र प्रदेशातून रेल्वेने येणार १ हजार ५० मजूर

ठळक मुद्देदेसाईगंजात उतरणार : बुधवारी सकाळी ९.३० वाजता पोहोचणार; प्रशासनाकडून बसेसची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज/कोरची : आंध्र प्रदेश राज्यातील क्रिष्णा जिल्ह्यातून १ हजार ५० मजूर देसाईगंज रेल्वेस्थानकावर उद्या बुधवारी पोहोचणार आहेत. सदर रेल्वे बुधवारी रात्री १ वाजता आंध्रप्रदेशातील रायणापांडू येथून प्रस्थान होऊन देसाईगंज येथे बुधवारी सकाळी ९.३० वाजता पोहोचणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील सुमारे १३ हजार मजूर मिरची तोडण्यासाठी आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यात गेले होते. तेलंगणा राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे तेलंगणा राज्यातील मजूर ट्रक व इतर साधनांच्या मदतीने गडचिरोली जिल्ह्यात पोहोचले. क्रिष्णा जिल्हा आंध्रप्रदेशची राजधानी अमरावतीला लागून आहे. सदर जिल्हा गडचिरोलीपासून १ हजार पेक्षा अधिक किमी अंतरावर आहे. त्यामुळे एवढ्या दुरून वाहनाने येणे अशक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन या मजुरांना रेल्वेने पाठविले जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ५० मजूर क्रिष्णा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मिरची तोडणीचे काम करीत होते. सदर मजुरांना देसाईगंज रेल्वेस्थानकावर सोडले जाणार आहे. संबंधित मजुरांना त्यांच्या तालुक्यात सोडून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची आरोग्य तपासणी न करता ज्या तालुक्यातील मजूर आहेत, त्या ठिकाणी त्यांना पाठविले जाणार आहे. तालुकास्थळी पोहोचल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल. चामोर्शी तालुक्यातील सर्वाधिक ५८९ मजूर आहेत. त्याचबरोबर कोरची, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, मुलचेरा, कुरखेडा या तालुक्यांमधीलही मजुरांचा समावेश आहे. याच रेल्वेने चंद्रपूर, गोंदिया, भंडारा येथील ४० मजूर येणार आहेत. या सर्व मजुरांना मंगळवारी रेल्वेमध्ये बसविण्यात आले आहे.
बसस्थानकावरील सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भेट दिली. यावेळी देसाईगंजचे एसडीओ, मुख्याधिकारी, संवर्ग विकास अधिकारी उपस्थित होते. रेल्वेने मजूर आल्यानंतर त्यांना पोहोचविण्यासाठी काय व्यवस्था आहे, याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणली.

२८ बसगाड्या उपलब्ध होणार
रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना देसाईगंज येथून त्यांच्या तालुकास्थळी पोहोचविले जाणार आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या २८ बसेस भाड्याने घेतल्या आहेत. या सर्व बसेसचा खर्च मदत व पुनर्वसन विभागाकडून केला जाणार असल्याने प्रवाशांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Web Title: 1,050 laborers will come from Andhra Pradesh by train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.