गडचिरोलीतील १०३ हेल्पलाईन बंदच
By Admin | Updated: November 25, 2015 03:58 IST2015-11-25T03:58:10+5:302015-11-25T03:58:10+5:30
महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने १०३ हेल्पलाईन जिल्हा पातळीवर पोलीस विभागात

गडचिरोलीतील १०३ हेल्पलाईन बंदच
गडचिरोली : महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनाने १०३ हेल्पलाईन जिल्हा पातळीवर पोलीस विभागात सुरू केली आहे. मात्र गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयातील हेल्पलाईन बंद असल्याचे दिसून आले आहे. २५ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून स्पष्ट झाले आहे. ही हेल्पलाईन सुरू आहे किंवा नाही याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही माहिती नसल्याचे त्यांच्याशी संपर्क साधल्यावर लक्षात आले.
देशात व राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यात ६० बलात्काराच्या घटना घडल्या. ५६ छेडछाडीच्या घटनाही घडल्या. प्रवासादरम्यान वा अन्यत्र ठिकाणी संकटात असलेल्या महिलांना तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने १०३ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली मात्र जिल्हा पोलीस मुख्यालयात या हेल्पलाईनवर काहीही प्रतिसाद मिळत नाही. ही हेल्पलाईन पूर्णत: बंद असल्याचे दिसून येत आहे. ही हेल्पलाईन बंद असल्याचे लक्षात आल्यावर लोकमत प्रतिनिधीने रविवारी रात्री ७ वाजता १०० क्रमांकाच्या पोलीस मुख्यालयातील कक्षाला संपर्क केला. त्या महिला कर्मचाऱ्याने १०३ हा नगर पालिकेशी संबंधित नंबर असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा १०३ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधला असता सदर क्रमांक बंद असल्याचे दिसून आले. कोणत्याही कर्मचाऱ्याची नियुक्ती गडचिरोली पोलीस मुख्यालयात करण्यात आली नाही, असे यावरून दिसून येते.
गडचिरोली जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या प्रकरणात तक्रारी नोंदविण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्येच जावे लागते व तेथे तक्रार दाखल करावी लागते, असे दिसून येते व या हेल्पलाईनविषयी महिलांमध्येही जिल्हाभर कुठेही जनजागृती करण्यात आलेली नाही. शाळा, महाविद्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन करून त्यांच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचारासंदर्भात मार्गदर्शन करण्याबाबत दिशानिर्देश देण्यात आले होते. परंतु शाळकरी व महाविद्यालयीन मुलींनाही फारशी माहिती नसल्याचे दिसून आले. जिल्ह्यात ही हेल्पलाईन बंद असल्याने अद्याप एकही तक्रार यावर नोंदविण्यात आली नाही, हे स्पष्ट झाले. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
महिलांवरील अत्याचाराबाबत विशेष हेल्पलाईन असल्याची आपल्याला माहिती नाही. अशी घटना घडली तर आपण पालक, शिक्षक किंवा वडील बंधू यांना माहिती देतो. त्यानंतर तेच काय ते निर्णय घेतात, अशी घटना आपल्याबाबत अद्याप तरी घडलेली नाही.
- मीनाक्षी मेश्राम,
विद्यार्थिनी आरमोरी
स्थानिक पोलीस ठाण्याला याबाबत अनेकदा माहिती दिली जाते. गावात अशा घटना घडल्या तर गावपुढारी, पोलीस पाटील पुढाकार घेऊन या तक्रारींचा निपटारा करतात. गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यास याबाबत पोलिसांचीही मदत घेतली जाते. काही दिवसांपूर्वी कायदेविषयक शिबिर शाळेमध्ये झाले तेव्हा काही माहिती देण्यात आली होती.
- अर्चना मांडवकर, विद्यार्थिनी
१०३ क्रमांकाची हेल्पलाईन सुरू आहे किंवा नाही हे आपल्याला निश्चित माहित नाही. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नुकतेच गडचिरोली येथे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात राज्य महिला आयोगाच्या सदस्य स्वत: हजर होत्या. त्यांनी महिलांना याविषयची माहिती दिली.
- संदीप पाटील,
जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली