१००% धानाची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 00:50 IST2016-09-20T00:50:49+5:302016-09-20T00:50:49+5:30
आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीच्या वतीने यंदा प्रथमच जिल्हाभरातील ६० वर ...

१००% धानाची उचल
यंदा प्रथमच : भरडाईचे काम ९२ टक्क्यांवर पोहोचले
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय गडचिरोलीच्या वतीने यंदा प्रथमच जिल्हाभरातील ६० वर केंद्रांवरून खरीप व रबी हंगामातील मिळून खरेदी केलेल्या धानाची १०० टक्के उचल झाली आहे. उचल झालेल्या धानापैकी एकूण ३ लाख ६१ हजार ७८७ क्विंटल धानाची आतापर्यंत भरडाई झाली असून भरडाईचे काम ९२ टक्क्यांवर सद्य:स्थितीत पोहोचले आहे.
आदिवासी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी हे दोन प्रादेशिक कार्यालये आहेत. या कार्यालयामार्फत कुरखेडा, कोरची, धानोरा, घोट, आरमोरी आदी उपप्रादेशिक कार्यालये आहेत. या कार्यालयामार्फत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी लाखो क्विंटल धानाची आधारभूत खरेदी योजना व एकाधिकार खरेदी योजनेंतर्गत खरेदी केली जाते. यंदा सन २०१५-१६ या वर्षात गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत खरीप व रबी दोन्ही हंगाम मिळून एकूण २ लाख ६२ हजार २१९ क्विंटल धानाची तर अहेरी कार्यालयांतर्गत यंदा दोन्ही हंगाम मिळून १ लाख २९ हजार ३५६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. जिल्हाभरात एकूण ३ लाख ९१ हजार ५७६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी ३ लाख ६१ हजार ७८७ क्विंटल इतक्या धानाची आतापर्यंत भरडाई करण्यात आली आहे. भरडाई कामाची टक्केवारी ९२.३९ आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत २ लाख ४४ हजार ४५५ तर अहेरी कार्यालयांतर्गत १ लाख १७ हजार ३३२ क्विंटल धानाची भरडाई आतापर्यंत करण्यात आली आहे. गडचिरोली कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या धानाच्या भरडाईची टक्केवारी ९३.२३ तर अहेरी कार्यालयाच्या धान भरडाईच्या कामाची टक्केवारी ९०.७० आहे.
आदिवासी विकास महामंडळांतर्गत दरवर्षी धान खरेदी करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडे गोदामांची व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाळ्यात संबंधित धान केंद्राच्या परिसरात शेकडो क्विंटल धान ताडपत्री झाकून ठेवण्यात येत होते. परिणामी या धानाची मोठी नुकसान होत होती. या फटका आदिवासी विकास महामंडळाला दरवर्षी सहन करावा लागत होता. त्यामुळे गडचिरोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी सन २०१५-१६ या वर्षात खरीप हंगामात ज्या संस्थांकडे केंद्रावर गोदाम व ओट्यांची व्यवस्था आहे, अशाच संस्थेच्या धान खरेदी केंद्राला मंजुरी प्रदान केली. या दृष्टीने आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयानेही कठोर धोरण अवलंबिले. त्यामुळे यंदा उघड्यावर धान अत्यल्प प्रमाणात ठेवण्यात आले. शिवाय सर्वच धान खरेदी केंद्रावरून लवकर धानाची उचल करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)
२ लाख ४२ हजार क्विंटल तांदूळ उपलब्ध
आदिवासी विकास महामंडळाने गडचिरोली व अहेरी कार्यालयांतर्गत असलेल्या सहकारी संस्थांमार्फत खरेदी केलेल्या एकूण ३ लाख ६१ हजार ७८७ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे. या भरडाईतून सध्या २ लाख ४२ हजार ३९७ क्विंटल कच्चा तांदूळ उपलब्ध झाला आहे. यापैकी २ लाख २६ हजार ६८८ क्विंटल तांदूळ भारतीय अन्न महामंडळाकडे (एफसीआयकडे) तर १५ हजार ७०८ क्विंटल कच्चा तांदूळ, राईसमिलर्सकडे शिल्लक आहे, अशी माहिती आदिवासी विकास महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
२९ हजार क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत खरीप व रबी दोन्ही हंगाम मिळून यंदा २ लाख ६२ हजार २१९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी २ लाख ४४ हजार ४५५ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे. गडचिरोली व अहेरी कार्यालय मिळून अद्यापही एकूण २९ हजार क्विंटल धान भरडाईच्या प्रतीक्षेत आहे. सदर प्रक्रिया राबविण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाकडून गतीने कार्यवाही सुरू आहे.
गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत सहकारी संस्थांच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या धानाच्या भरडाईची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. सदर काम ९३.२३ टक्क्यावर पोहोचले आहे. उर्वरित ७ टक्के भरडाईचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्या दृष्टीने राईसमिलर्संना भरडाईचे आदेश देण्यात आले आहेत. धानाचे नुकसान होऊ नये, यासाठी यंदा धानाची उचल व भरडाईची प्रक्रिया दरवर्षीपेक्षा लवकर करण्यात आली आहे. संस्थेचे कमिशन व तूटबाबतचा हिशोब पूर्ण होईल.
- विजय गांगुर्डे, प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ गडचिरोली