एटीएममुळे १० हजारांचा चुना
By Admin | Updated: September 6, 2015 01:24 IST2015-09-06T01:24:34+5:302015-09-06T01:24:34+5:30
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएममधून सत्यनारायण अंकय्या कोमरेवार यांना २० हजार रूपयेच मिळाले.

एटीएममुळे १० हजारांचा चुना
आष्टी येथील प्रकार : आयटी विभागाचे होत आहे दुर्लक्ष
आष्टी : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएममधून सत्यनारायण अंकय्या कोमरेवार यांना २० हजार रूपयेच मिळाले. मात्र त्यांच्या खात्यातून ३० हजार रूपये वजा झाल्याने त्यांना १० हजार रूपयांचा चूना लागला आहे. झालेल्या प्र्रकाराबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून सदर रक्कम खात्यावर जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सत्यनारायण अंकय्या कोमरेवार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएममधून प्रत्येक वेळा १० हजार रूपये प्रमाणे तीन वेळा ३० हजार रूपये काढायचे होते. मात्र त्यांना दोन वेळा प्रत्येकी १० हजार रूपये प्रमाणे २० हजार रूपये प्राप्त झाले. मात्र त्यांच्या खात्यातून ३० हजार रूपये वजा झाले. याबाबत त्यांनी शाखा अधिकारी दुर्गे यांच्याकडे रितसर तक्रार केली. एटीएममध्ये कमी रक्कम असल्याने हा मशीनचा दोष असल्याचे मॅनेजरने सांगितले. त्याचबरोबर या प्रकरणाची कोमरेवार यांनी जिल्हास्तरीय आयटी विभागाकडेसुध्दा तक्रार केली.
उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होईल, असे सांगण्यात आले. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही खात्यात रक्कम जमा झाली नाही. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालावे, अशी मागणी सत्यनारायण कोमरेवार यांनी केली आहे. (वार्ताहर)