सप्टेंबरमध्ये १० नगर पंचायतीच्या निवडणुका

By Admin | Updated: June 3, 2015 01:51 IST2015-06-03T01:51:33+5:302015-06-03T01:51:33+5:30

१ मे रोजी राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यात नव्या १० नगर पंचायती स्थापन केल्या आहे.

10 municipal panchayat elections in September | सप्टेंबरमध्ये १० नगर पंचायतीच्या निवडणुका

सप्टेंबरमध्ये १० नगर पंचायतीच्या निवडणुका

गडचिरोली : १ मे रोजी राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यात नव्या १० नगर पंचायती स्थापन केल्या आहे. या नगर पंचायतीच्या निवडणुका सप्टेंबर २०१५ अखेर घेतल्या जातील. या दृष्टीने जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. २३ आॅक्टोबर पूर्वी १० नगर पंचायतीवर नवे नगराध्यक्ष विराजमान होतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांनी लोकमतशी बोलताना मंगळवारी दिली.
गडचिरोली जिल्ह्यात कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, चामोर्शी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा, अहेरी या तालुका मुख्यालयाच्या ग्रामपंचायतींना १ मे रोजी अधिसूचना जारी करून राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने नगर पंचायतीचा दर्जा बहाल केला आहे. या सर्व ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतदान प्रक्रिया थांबवून येथे नगर पंचायती घोषीत करण्यात आल्या. त्यानंतर तहसीलदारांकडे या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक म्हणून सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या रचनेवरही आता परिणाम होणार आहे. विद्यमान जिल्हा परिषद ही ५१ सदस्यांची होती. तर जिल्ह्यात १०२ पंचायत समिती गण होते. नगर पंचायतीच्या स्थापनेमुळे आता जिल्हा परिषदेचे आरमोरी क्षेत्र निर्लेखीत होणार आहे. त्यामुळे एक जिल्हा परिषद सदस्य कमी होणार आहे. तर १०२ पं.स. गणापैकी पाच पंचायती समिती गण निर्लेखीत होतील. यामध्ये आरमोरी येथील दोन, चामोर्शी येथील एक व एटापल्ली येथील एका पंचायत समिती गणाचा समावेश आहे. २४ एप्रिलला याबाबतची अधिसूचना जारी झाली, तेव्हापासून तीन महिन्यांचा कालावधी गृहीत धरल्यास सप्टेंबर महिन्यात या नगर पंचायतीच्या निवडणुका घेणे अपहार्य आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागणार आहे. २३ आॅक्टोबरला १० नगर पंचायतीवर नवे नगराध्यक्ष विराजमान होतील. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. लवकरच या संदर्भात प्रशासन आवश्यक त्या बाबींची पूर्तता करणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 10 municipal panchayat elections in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.