भामरागड पर्यटनासाठी १० कोटींची गरज
By Admin | Updated: November 29, 2015 02:19 IST2015-11-29T02:19:46+5:302015-11-29T02:19:46+5:30
जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तयार केला असून या पर्यटन विकास आराखड्यात भामरागड ...

भामरागड पर्यटनासाठी १० कोटींची गरज
पर्यटन विकास आराखडा तयार : शासनाकडे निधीची केली आहे मागणी
गडचिरोली : जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तयार केला असून या पर्यटन विकास आराखड्यात भामरागड तालुक्याला पर्यटनदृष्ट्या विकसित करायचे असेल तर १० कोटी ४७ लाख रूपयांची गरज असल्याचे म्हटले आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे सादर केला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी निधीची प्रतीक्षा सुरू आहे.
भामरागड हा गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगड राज्याला लागलेला तालुका आहे. सदर तालुका आदिवासीबहुल असून घनदाट जंगलाने व्यापला आहे. काही वर्षांपूर्वी जंगलव्याप्त भाग पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकते. ही बाब अनेकांच्या पचनी न पडणारी होती. मात्र मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना जंगल पर्यटनाचे विशेष आकर्षण असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध यासारख्या जंगलव्याप्त पर्यटनस्थळांवर गर्दी वाढत असल्याचे दिसून येते. यामध्ये भामरागड तालुकाही मागे नाही. याही तालुक्याला मागील दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक पर्यटकांनी भेट दिली आहे.
भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प जगप्रसिद्ध आहे. या प्रकल्पाला भेट देण्यासाठी देशभरातील अनेक नागरिक येतात. हेमलकसा जवळील तीन नद्यांचे संगम येणाऱ्या पर्यटकांचे पारणे फिटते. पुढे जाऊन बिनागुंडा येथील धबधबा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरू शकते. मात्र बिनागुंडा धबधब्याजवळ जाण्यासाठी अजूनही रस्त्यांची सुविधा उपलब्ध नाही.
भामरागड तालुका डोंगरदऱ्या व घनदाट जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे या तालुक्यात पर्यटकांना आकर्षित करायचे असेल तर रस्त्यांचा विकास होणे आवश्यक आहे. त्रिवेणी संगमावर बोटिंगची व्यवस्था, राहण्यासाठी रेस्ट हॉऊस, बगीचा आदींचा विकास करण्यासाठी जवळपास १० कोटी ४७ लाख रूपयांचा खर्च येऊ शकतो. पर्यटकांसाठी या सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास भामरागड तालुक्यात पर्यटकांची गर्दी बघायला मिळेल. (नगर प्रतिनिधी)