१ लाख १६ हजार ७९० रूपयांची दारू जप्त
By Admin | Updated: September 3, 2015 00:57 IST2015-09-03T00:57:31+5:302015-09-03T00:57:31+5:30
१ व २ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर व कुनघाडा येथे धाड घालून १ लाख १६ हजार ७९० रूपयाचा दारूसाठा जप्त केला आहे.

१ लाख १६ हजार ७९० रूपयांची दारू जप्त
दोन दिवसातील कारवाई : चामोर्शी तालुक्यात जयरामपूर, कुनघाडा येथे दारूसाठा आढळला
गडचिरोली : १ व २ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर व कुनघाडा येथे धाड घालून १ लाख १६ हजार ७९० रूपयाचा दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणात चार आरोपींविरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ सप्टेंबर रोजी पोलीस पथकाने जयरामपूर येथे सकाळी ९.३० वाजता धाड घातली या धाडीत अमोल लक्ष्मण गोटपर्तीवार व प्रकाश उद्धव चिंचोळकर या दोन दारूविक्रेत्यांकडून विदेशी दारूच्या १८० एमएल मापाच्या ७२२ नग निपा ८६ हजार ६४० रूपयांच्या जप्त करण्यात आल्या. तर दारूविक्रीतून गोळा झालेले ११ हजार ४०० रूपये असा एकूण ९८ हजार ४० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. तर २ सप्टेंबर रोजी कुनघाडा येथील प्रेमिला रमेश रामटेके व प्रीती उमेश रामटेके या दोन आरोपींकडून विदेशी दारूच्या १८ हजार ७५० रूपयांच्या १२५ निपा जप्त करण्यात आल्या. प्रेमिला रामटेके व प्रीती रामटेके या दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या आरोपींविरूद्ध चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ सप्टेंबर रोजी कुरखेडा तालुक्यातील आंधळी येथील विजया विजय कराडे व विजय कराडे या दोघांकडून १३०० रूपये किंमतीचा दारूसाठी पोलिसांनी जप्त केला आहे. या आरोपीविरोधात कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष पथकाने दारूविक्रेत्यांविरोधात कारवाई तीव्र केली असून महिला दारूविक्रेत्यांचे प्रमाण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असल्याची माहिती गेल्या काही दिवसांतील कारवायांवरून पुढे आली आहे.