Would love to train in India if given the opportunity - Diego Forlan | संधी मिळाल्यास भारतात प्रशिक्षण देण्यास आवडेल - दिएगो फोरलान
संधी मिळाल्यास भारतात प्रशिक्षण देण्यास आवडेल - दिएगो फोरलान

मुंबई : ‘भारतात खेळताना मला खूप चांगले अनुभव आले. येथे खेळताना मजा आली. नक्कीच मला पुन्हा एकदा फुटबॉलच्या माध्यमातून येण्यास आवडेल. कदाचित संधी मिळाली, तर प्रशिक्षक म्हणूनही येथे येण्यास नक्कीच आवडेल,’ असे मत उरुग्वेचा स्टार
फुटबॉलपटू दिएगो फोरलान याने व्यक्त केले. 
सध्या सुरू असलेल्या ला लीगा स्पर्धेसाठी भारताच्या एका अग्रणी टायर कंपनीने करार केला असून यानिमित्त मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमासाठी दिएगो सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. याआधी आयएसएल स्पर्धेत दिएगो मुंबई एफसी संघाकडून खेळला आहे. दिएगोने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘मला पुन्हा भारतात येण्यास आवडेल. येथे खेळण्याचा अनुभव शानदार आहे. भारतीयांनी माझे आणि माझ्या परिवाराचे जल्लोषात स्वागत केले आहे. तसेच येथील काही खेळाडूंसह माझी चांगली मैत्रीही आहे. संधी मिळाल्यास येथे फुटबॉल प्रशिक्षक म्हणून काम करण्यास नक्की आवडेल.’
२०१० साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत दिएगो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. नुकताच त्याने दक्षिण अमेरिकेतून फुटबॉल प्रशिक्षणाचा परवाना मिळवला असून या जोरावर तो द. अमेरिकेसह आशिया खंडातील कोणत्याही देशात प्रशिक्षण देऊ शकतो.
मात्र सध्या त्याचे लक्ष्य युरोपमध्ये प्रशिक्षण परवाना मिळवण्याचे आहे. मँचेस्टर युनायटेड आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद या बलाढ्य क्लब संघांकडून चमक दाखवलेल्या दिएगोने भारतीय फुटबॉलवरही मत व्यक्त केले. त्याने म्हटले की, ‘भारताला मजबूत संघांमध्ये येण्यास थोडा आणखी वेळ लागेल. भारतात गुणवत्तेची कोणतीही कमी नाही, मात्र काही गोष्टींवर अद्याप काम करणे जरुरी आहे. भारतीय खेळाडूंचा खेळ मी जवळून पाहिला असून ते मेहनती आहेत आणि तंदुरुस्तीबाबत जागृत आहेत. सध्या भारतामध्ये तळागाळातील खेळाडूंसाठी भक्कम व्यासपीठ निर्माण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर चांगल्या प्रशिक्षकांना भारतात आणावे लागेल.’


Web Title: Would love to train in India if given the opportunity - Diego Forlan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.