Wimbledon Tennis : फुटबॉल विश्वचषकाच्या प्रक्षेपणाला येथे बंदी; चाहत्यांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 20:44 IST2018-07-02T20:42:08+5:302018-07-02T20:44:19+5:30
रशियामध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून गतविजेत्या जर्मनीपाठोपाठ अर्जेंटिना, स्पेन या माजी विजेत्यांसह पोर्तुगाल या बलाढ्य संघांना गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे स्पर्धेतील विजेता कोण ठरेल याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीत यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या जगभरातील प्रेक्षकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेबाबतची रूची किती वाढत चालली असल्याचा अंदाज बांधता येईल.

Wimbledon Tennis : फुटबॉल विश्वचषकाच्या प्रक्षेपणाला येथे बंदी; चाहत्यांमध्ये नाराजी
विम्बल्डन - रशियामध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून गतविजेत्या जर्मनीपाठोपाठ अर्जेंटिना, स्पेन या माजी विजेत्यांसह पोर्तुगाल या बलाढ्य संघांना गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे स्पर्धेतील विजेता कोण ठरेल याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीत यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या जगभरातील प्रेक्षकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेबाबतची रूची किती वाढत चालली असल्याचा अंदाज बांधता येईल.
एकिकडे प्रेक्षकसंख्येचे हे विक्रम मोडले जात असताना लंडन येथे सोमवारपासून सुरू झालेल्या एका स्पर्धेत फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यांच्या प्रक्षेपणाला बंदी घालण्यात आली आहे. त्यात इंग्लंडचा संघ चांगली कामगिरी करत असूनही या निर्णयाने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. 141 वर्षांची परंपरा असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेला सोमवारपासून सुरूवात झाली. पण या स्पर्धेत फुटबॉल फ्री झोन ठेवण्यात आला आहे.
विश्वचषक स्पर्धेतील बाद फेरीचे सामने विम्बल्डनचे सामने पाहण्यासाठी येणा-या प्रेक्षकांना पाहता येणार नाही, अशी माहिती ऑल इंग्लंड क्लबने दिली आहे. विम्बल्डन स्पर्धेच्या परंपरेत कोणताही बदल करण्यात येणार नाही. याआधीही विम्बल्डनमध्ये फुटबॉलचे सामने दाखवण्यात आले नव्हते. मग ती युरोपियन चॅम्पियनशीप असो किंवा विश्वचषक, नियमात कोणताही बदल होणार नाही, असेही आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कधीपासून आहे हा नियम ?
विम्बल्डन आयोजकांचा हा निर्णय टेनिस चाहत्यांसाठी आश्चर्यकारक नाही. 1996च्या युरो स्पर्धेपासून ही परंपरा कायम आहे. 2010च्या विश्वचषक स्पर्धेचे सामने सराव सत्रात दाखवण्यात यावे अशी ब्रिटनच्या अँडी मरे याने केलेली विनंती मान्य करण्यात आली होती. पण यंदा तशी काहीच शक्यता नाही.
एकाच दिवशी दोन फायनल
विश्वचषक फुटबॉल आणि विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम लढती 15 जुलैला होणार आहेत. यापूर्वी 1990 आणि 2006 च्या विश्वचषक स्पर्धेत असा योगायोग झाला होता.