आशिया चषक पात्रता मिळवणे महत्त्वाचे नाही तर सलग नऊ विजयांना अर्थ नाही राहणार - कॉन्स्टेन्टाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:42 IST2017-08-21T01:41:46+5:302017-08-21T01:42:16+5:30
जर आशिया चषक स्पर्धेची पात्रता फेरी पार करण्यात यश आले नाही, तर सलग नऊ सामन्यांतील विजयाला काहीच महत्त्व राहणार नाही, असे भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेन्टाइन यांनी म्हटले.

आशिया चषक पात्रता मिळवणे महत्त्वाचे नाही तर सलग नऊ विजयांना अर्थ नाही राहणार - कॉन्स्टेन्टाइन
मुंबई : जर आशिया चषक स्पर्धेची पात्रता फेरी पार करण्यात यश आले नाही, तर सलग नऊ सामन्यांतील विजयाला काहीच महत्त्व राहणार नाही, असे भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेन्टाइन यांनी म्हटले. शनिवारी मुंबईत झालेल्या मॉरिशसविरुद्धच्या सामन्यात २-१ असा विजय मिळविल्यानंतर कॉन्स्टेन्टाइन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
कॉन्स्टेन्टाइन यांनी सांगितले, ‘जर आम्ही आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरलो नाही, तर सलग नऊ सामन्यांतील विजयी कामगिरीला काहीच महत्त्व राहणार नाही. तरी, या ऐतिहासिक कामगिरीचा मला अभिमान आहे. मात्र, जर आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरलो नाही, तर १०, ११ किंवा १२ विजय मिळवण्याला अर्थ काय राहणार?’
कॉन्स्टेन्टाइन यांनी म्हटले, ‘काही विक्रम बनले आहेत आणि ते खूप चांगले आहेत. विजय मिळवणे महत्त्वपूर्ण आहेत आणि हे सातत्य कायम राखण्यास आम्ही इच्छुक आहोत. आम्हाला विजय मिळवून पात्रता मिळवावी लागेल.’
त्याचवेळी, मॉरिशसविरुद्धच्या सामन्यात पहिल्या सत्रात भारताचा खेळ निराशाजनक झाला. याबाबत कॉन्स्टेन्टाइन म्हणाले, ‘ज्या प्रकारे संघ पहिल्या सत्रात खेळला, ते मला आवडले नाही. प्रतिस्पर्धी संघाला चांगल्या सुरुवातीची संधी दिली गेली तेव्हा मी नाराज होतो. परंतु, भारतीय कर्णधाराने सर्व परिस्थिती योग्य रीतीने हाताळली.