भारताचे माजी ऑलिम्पियन फुटबॉलपटू फॉर्च्युनाटो फ्रान्को यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 18:16 IST2021-05-10T18:16:13+5:302021-05-10T18:16:27+5:30
Indian Football Legend Fortunato Franco Dies फ्रान्को यांची ओळख ही भारताचे आघाडीचे मध्यरक्षक म्हणून होती. त्यांनी १९६० ते १९६४ हे वर्ष गाजवले. भारतीय फुटबाॅलसाठी हे सुवर्णमय असे वर्ष ठरले होते.

भारताचे माजी ऑलिम्पियन फुटबॉलपटू फॉर्च्युनाटो फ्रान्को यांचे निधन
पणजी- गोव्याचे ऑलिम्पियन स्टार फॉर्च्युनाटो फ्रान्को यांचे सोमवारी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. १९६२ मध्ये भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या संघाचे ते सदस्य होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय फुटबॉल क्षेत्रातील एका महान व्यक्तीचे निधन झाले आहे. अखिल भारतीय फुटबाॅल संघटना आणि गोवाफुटबॉल संघटना यांनी फ्रान्को यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. फ्रान्को यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि एक मुलगी आहे.
फ्रान्को यांची ओळख ही भारताचे आघाडीचे मध्यरक्षक म्हणून होती. त्यांनी १९६० ते १९६४ हे वर्ष गाजवले. भारतीय फुटबाॅलसाठी हे सुवर्णमय असे वर्ष ठरले होते. १९६० मध्ये रोम ऑलिम्पिक स्पर्धेतही ते भारतीय संघाचे सदस्य होते. जकार्तामध्ये १९६२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. भारताकडून फ्रान्को २६ सामन्यांत प्रतिनिधीत्व केले. यामध्ये १९६२ च्या आशियाई चषकाचाही समावेश आहे. हा संघ उपविजेता ठरला होता. त्यांच्या प्रतिनिधित्वात भारतीय संघाने मर्डेका चषकात १९६४ आणि १९६५ मध्ये राैप्य आणि कांस्यपदक पटकाविले होते. फ्रान्को यांनी १९६२ मध्ये केलेली कामगिरी देशवासियांसाठी अनमोल अशी ठरली होती. त्यांच्या योगदानामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचला होता. भारताने दक्षिण कोरियाचा २-१ ने पराभव केला होता. फ्रान्को यांनी स्थानिक स्पर्धांतही जबरदस्त कामगिरी केलेली आहे.
अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महासचिव कुशल दास आणि ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पटेल यांनी संदेशात म्हटले आहे की, फ्रान्को यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुख झाले. भारतीय फुटबॉल क्षेत्रासाठी त्यांचे योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे. दास यांनी म्हटले की, ते दिग्गज फुटबाॅलपटू होते. त्यांच्याकडून अनेक पिढ्यांनी प्रेरणा घेतली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या सहवेदना आहेत.
दरम्यान, गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांनी दुख व्यक्त करताना फ्रान्को यांच्या आठवणींना उजाळा दिला. गोवा फुटबॉल संघटनेसाठी नेहमी ते मार्गदर्शन करायचे. ल्युसोफोनिया क्रीडा स्पर्धेवेळी त्यांनी गोव्याच्या संघाला प्रोत्साहीत केले होते. त्यांच्या रक्तात फुटबॉल भिनला होता. त्यांची कामगिरी सदैव प्रेरणा देणारी असेल.
महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व
१९३७ मध्ये कोलवाळ (गोवा) येथे फ्रान्को यांचा जन्म झाला होता. केवळ ६ वर्षांचे असताना ते आपल्या परिवारासह मुंबईत गेले. तिथेेच त्यांच्या फुटबॉल खेळाला आकार मिळाला. त्यांनी संतोष चषकात महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व केले होते. ते संघाचे कर्णधारही बनले होते. त्यांनी पश्चिम रेल्वेच्या संघाकडून आणि टाटा फुटबॉल क्लबकडूनही ते खेळले. गोव्याच्या साळगावकर संघाकडूनही ते खेळले. १९६० मध्ये त्यांनी रोम ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.