अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय भिडणार, फिफा विश्वचषक पात्रता फेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 07:25 IST2024-03-21T07:25:08+5:302024-03-21T07:25:40+5:30
मध्यरक्षक जॅक्सन व अन्वर दुखापतीमुळे फुटबाॅलपासून दूर होते.

अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय भिडणार, फिफा विश्वचषक पात्रता फेरी
आभा (सौदी अरेबिया) : जॅक्सन सिंह आणि अन्वर अली यांच्या पुनरागमनामुळे उत्साह संचारलेला भारतीय फुटबाॅल संघ गुरुवारी फिफा विश्वचषक पात्रता लढतीत गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध बाजी मारत महत्त्वपूर्ण तीन गुण मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.
मध्यरक्षक जॅक्सन व अन्वर दुखापतीमुळे फुटबाॅलपासून दूर होते. दुसऱ्या फेरीतील प्राथमिक संयुक्त पात्रता सामन्यात अफगाणविरुद्ध वरचढ ठरण्याची भारताला अपेक्षा आहे. दोन सामन्यांत तीन गुणांसह भारतीय संघ अ गटात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कतार दोन विजयांसह सहा गुण मिळवून अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी दोन्ही सामने गमावलेला अफगाणिस्तान अखेरच्या स्थानी आहे. कुवेतविरुद्ध विजय मिळवून भारताने पहिल्यांदाच तिसऱ्या फेरीत पोहोचण्याची आशा निर्माण केली आहे.
छेत्रीचा ‘चौकार’
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात १९४९मध्ये पहिला सामना झाल्यानंतर दोन्ही संघ अनेकदा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. विश्वचषक पात्रता, आशियाई पात्रता आणि अन्य उपखंडीय, निमंत्रित सामन्यांमध्ये दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व सुनील छेत्री आणि मनवीर सिंह करणार आहेत. छेत्रीने अफगाणिस्तानविरुद्ध चार गोल केले आहेत.