FIFA World Cup qualification: The last chance for the Indian team to qualify for the main event | फिफा विश्वचषक पात्रता: भारतीय संघाकडे मुख्य स्पर्धा पात्रतेची अखेरची संधी
फिफा विश्वचषक पात्रता: भारतीय संघाकडे मुख्य स्पर्धा पात्रतेची अखेरची संधी

मस्कत: चारपैकी तीन सामने अनिर्णीत राखून ‘ई’गटातील चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत मंगळवारी बलाढ्य ओमानविरुद्ध ‘करा किंवा मरा’अशा निर्धारासह खेळण्याचे आव्हान असेल. दुसरीकडे प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी भारतीय खेळाडू अनपेक्षित विजयाची नोंद करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

गुवाहाटीत सप्टेंबर महिन्यात झालेल्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात पूर्वार्धात सुनील छेत्री यानो गोल करत भारताच्या आशा उंचावल्या होत्या, पण अखेरच्या दहा मिनिटात ओमान संघाने दोन गोल नोंदवून अपेक्षांवर पाणी फेरले होते. १४ नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध ओमानने ४-१ असा शानदार विजय साजरा केला. भारताने मात्र आशियाई चॅम्पियन कतारविरुद्धची लढत गोलशून्य अशी बरोबरीत सोडविल्यानंतर रँकिंगमध्ये तळाच्या स्थानी असलेल्या अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध बरोबरीवरच समाधान मानले होते. तीन ड्रॉ तसेच एक पराभवामुळे भारतीय संघा तीन गुणांसह चौथ्या, तर ओमान संघ चार सामन्यात नऊ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. अव्वल स्थानी असलेल्या कतारचे दहा गुण आहेत. ओमनविरुद्ध विजय मिळाला नाही तर भारतीय संघ २०२२च्या विश्वचषक पात्रता फेरीतून बाद होईल.

भारताला २६ मार्च रोजी कतारविरुद्ध, बांगलादेशवरुद्ध ४ जून आणि अफगाणिस्तानविरुद्ध ९ जून रोजी सामने खेळायचे आहेत. ओमनाविरुद्ध भारताला किमान एक गुण मिळविणे क्रमप्राप्त झाले आहे. यामुळे २०२३ च्या आशियाई चषक पात्रता फेरीच्या तिसºया टप्यात स्थान मिळविणे सोपे होईल. ही २०२३ च्या आशियाई चषक पात्रता फेरीसाठी देखील संयुक्त पात्रता स्पर्धाही आहे. आठही गटातील तिसºया स्थानावरील संघ तसेच चौथ्या स्थानावरील उत्कृष्ट चार संघ आशियाई चषक पात्रता फेरीया तिसऱ्या टप्प्यात धडक देतील.
भारतीय संघ आता केवळ छेत्रीच्या खेळावर विसंबून नाही. प्रशिक्षक स्टिमक म्हणाले,‘ गुवाहाटी येथे ज्या ओमनविरुद्ध आम्ही खेळलो त्यापेक्षा सध्याचा संघ कैकपटींनी सरस वाटतो. यजमान संघ प्रबळ दावेदार वाटतो तर आमच्यासाठी कठीण अशी लढत असेल.’ (वृत्तसंस्था)

ओमानविरुद्ध विजय मिळवण्याचे लक्ष्य - सुनील छेत्री
‘भारताची नजर बदला घेण्यावर नसून पूर्ण गुण वसूल करण्यावर केंद्रित झाली आहे,’ असे मत भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले. भारताला सप्टेंबरमध्ये गुवाहाटी येथे ओमानविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता. छेत्री म्हणाला, ‘आम्ही वचपा काढण्याचा विचार करीत नाही. अखेर गुण महत्त्वाचे ठरतात. आमच्या डोक्यात एकच बाब आहे, मैदानात उतरा व सर्वोत्तम प्रयत्न करुन निकाल मिळवा.’ ओमानचा स्ट्रायकर अल मंधारने पात्रता फेरीच्या चार सामन्यांत यापूर्वीच चार गोल केले आहेत, पण प्रीतम कोटलच्या मते संघ सकारात्मक निकाल मिळवण्यात यशस्वी ठरेल. कोटल म्हणाला,‘केवळ अल मंधारच नाही, अल अलवाई, अल घसानी हे स्ट्रायकर बचाव फळीसाठी धोकादायक ठरू शकतात. ते वेगवान असून वेगाने आपले स्थान बदलतात व लांब अंतरावरुन गोल करू शकतात. त्यांच्या दूरवरच्या फटक्याबाबत सावधगिरी बाळगावी लागेल.’

भारतीय फुटबॉल संघ
गुरप्रीतसिंग संधू, अमरिंदरसिंग, धीरजसिंग, प्रीतम कोताल, निशु कुमार, राहुल भेके, नरेंदर, आदिल खान, सार्थक गोलुई, सुभाशीष बोस, मंदार राव देसाई, उदांतासिंग, जॅकीचंदसिंग, सेमिनलेन डाऊंगेल, रेनियर फर्नांडिस, विनित राय, सहल अब्दुल समद, प्रणय हलधर, अनिरूद्ध थापा, लालियांजुआला छांगटे, ब्रेंडन फर्नांडिस, आशिक कुरूनियान, सुनील छेत्री, मनवीरसिंग आणि फारुक चौधरी.

Web Title: FIFA World Cup qualification: The last chance for the Indian team to qualify for the main event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.