Fifa World Cup 2018 : विश्वचषक गतविजेत्यांना सलामी सामना कसोटीचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 03:41 PM2018-06-13T15:41:05+5:302018-06-13T15:41:05+5:30

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत तीन वेळा गतविजेत्या संघांना सलामीलाच पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे तर तीन वेळा गतविजेत्यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी संघांनी बरोबरीत रोखले आहे. 1982, 1990 आणि 2002 च्या विश्वचषक स्पर्धांवेळी सलामीलाच गतविजेत्या संघांना  पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

FIFA World Cup 2018: World Cup defending champions opener! | Fifa World Cup 2018 : विश्वचषक गतविजेत्यांना सलामी सामना कसोटीचा!

Fifa World Cup 2018 : विश्वचषक गतविजेत्यांना सलामी सामना कसोटीचा!

Next

- ललित झांबरे

विश्वचषक फुटबॉलच्या महाकुंभाला गुरुवारी सुरुवात होत आहे. शुभारंभाच्या सामन्यात यजमान रशियासमोर सौदी अरेबियाला नमविण्याचे आव्हान आहे. 'वेल बिगन इज हाफ डन' या म्हणीनुसार चांगली सुरुवात होणे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा सामना आपणच जिंकावा म्हणून दोन्ही संघ पूर्ण जोर लावतील यात शंका नाही.

इतिहासात डोकावले तर विश्वचषक स्पर्धेचा सलामी सामना गतविजेत्या संघांची कसोटी घेणाराच ठरला आहे. आतापर्यंत तीन वेळा गतविजेत्या संघांना सलामीलाच पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे तर तीन वेळा गतविजेत्यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी संघांनी बरोबरीत रोखले आहे.

1982, 1990 आणि 2002 च्या विश्वचषक स्पर्धांची सुरुवात सनसनाटी राहिली. सलामीलाच गतविजेत्या संघांना  पराभवाचा धक्का सहन करावा लागला. 1982 मध्ये अर्जेंटिनाचा संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरला खरा, पण बेल्जियमने त्यांना पहिल्याच सामन्यात 1-0 अशी मात देत खळबळ उडवून दिली. पुन्हा एकदा अर्जेंटिनावरच ही आफत कोसळली ती 1990 च्या स्पर्धेवेळी. यावेळी मेरुनसारख्या नवख्या संघाने त्यांना 1-0 अशी मात दिली. याप्रकारे सलामी सामन्यातच दोन वेळा पराभव पत्करलेला अर्जेंटिना हा फुटबॉल इतिहासातील एकमेव विश्वविजेता संघ ठरला.

अर्जेंटिनासारखीच नामुष्की ओढावली फ्रान्सवर. त्यांनी 1998 मध्ये विश्वविजेतेपद पटकावले पण 2002 च्या स्पर्धेत सलामीलाच त्यांना सेनेगलच्या संघाने 1-0 असा पराभवाचा धक्का दिला.

ब्राझील (1974), जर्मनी (1978) आणि इटली (1986) या विश्वविजेत्या संघांवर पुढच्याच स्पर्धेवेळी सलामीला पराभवाची नामुष्की तर नाही ओढवली पण ते विजयी सुरुवातसुध्दा करु शकले नाहीत. त्यांना अनुक्रमे युगोस्लाव्हिया, पोलंड आणि बल्गेरिया या संघांनी बरौबरीत रोखले.

विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला ऊरुग्वेमध्ये 13 जुलै 1930 रोजी. त्यादिवशी दोन सामने खेळले गेले. त्यात फ्रान्सने मेक्सिकोला 4-1 आणि अमेरिकेने बेल्जियमला 3-0 अशी मात दिली. त्यानंतर 1962 पर्यंत विश्वचषक स्पर्धेचे स्वरुप दरवेळी बदलत राहिले. 1966 पासून त्यात स्थिरता आली.

1966 पासूनचे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे सलामी सामने पुढीलप्रमाणे -

वर्ष         सामना                                      गोल       
1966   इंग्लंड बरोबरी उरुग्वे                     0-0
1970   मेक्सिको बरोबरी सोव्हि. युनीयन    0-0
1974   ब्राझील बरोबरी युगोस्लाव्हिया        0-0
1978   जर्मनी बरोबरी पोलंड                    0-0
1982   बेल्जियम विजयी वि. अर्जेँटिना      1-0
1986   बल्गेरिया बरोबरी इटली                 1-1
1990   मेरुन विजयी वि. अर्जेंटिना         1-0
1994   जर्मनी विजयी वि. बोलिव्हिया        1-0
1998   ब्राझील विजयी वि. स्कॉटलंड         2-1
2002   सेनेगल विजयी वि. फ्रान्स              1-0
2006   जर्मनी विजयी वि. कोस्टारिका       4-2
2010   द.आफ्रिका बरोबरी मेक्सिको        1-0
2014   ब्राझील विजयी वि. क्रोएशिया        3-1

Web Title: FIFA World Cup 2018: World Cup defending champions opener!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.