Fifa World Cup 2018 : 'या' खेळाडूंच्या नावावर आहेत सर्वाधिक जास्त गोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 13:57 IST2018-06-12T13:57:03+5:302018-06-12T13:57:03+5:30
विश्वचषक फुटबॉल महासंग्रमात जवळपास 736 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या खेळाडूंमध्ये 53 असे खेळाडू आहेत, की त्यांच्या नावावर विश्वचषकात एक तरी गोल केल्याची नोंद आहे.

Fifa World Cup 2018 : 'या' खेळाडूंच्या नावावर आहेत सर्वाधिक जास्त गोल
मुंबई : येत्या गुरुवारपासून सुरू होत असलेल्या विश्वचषक फुटबॉल महासंग्रामाकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच यंदाच्या स्पर्धेत कोणता स्टार खेळाडू आपले वर्चस्व प्रस्थापित करणार, याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विविध लीगच्या माध्यमातून क्लब फुटबॉल गाजवणारे स्टार फुटबॉलपटू आपल्या देशाकडून खेळताना कशी कामगिरी करतात, याचीच उत्सुकता सध्या सर्वांना लागली आहे. दरम्यान, या विश्वचषक फुटबॉल महासंग्रमात जवळपास 736 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या खेळाडूंमध्ये 53 असे खेळाडू आहेत, की त्यांच्या नावावर विश्वचषकात एक तरी गोल केल्याची नोंद आहे.
विश्वचषकात सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन जर्मनीचा स्टार फॉरवर्ड थॉमस मुलर याच्याच नावावर सर्वाधिक 10 गोल आहेत. त्यानंतर कोलंबियाचा खेळाडू जेम्स रोड्रिग्जच्या नावावर 6 गोल आहेत. त्यापाठोपाठ अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आणि गोंजालो हिगुएन, उरुग्वेचा लुईस सुआरेज आणि ऑस्ट्रेलियाचा टिम काहिल यांच्या खात्यावर 5-5 गोल आहेत.
फिफा 2018 विश्वचषकात सहभागी खेळाडूंची नावे आणि गोल...
- थॉमस मुलर (जर्मनी) - 10
- जेम्स रोड्रिग्ज (कोलंबिया) - 6
- लियोनेल मेसी (अर्जेंटीना) - 5
- गोंजालो हिगुएन (अर्जेंटिना) - 5
- लुइस सुआरेज (उरुग्वे) - 5
- टिम काहिल (ऑस्ट्रेलिया) - 5
फिफा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक जास्त गोल...
फिफा विश्वचषकात जर्मनीचा माजी स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोजेने 24 सामन्यात सर्वाधिक 16 गोल केले आहेत. त्यानंतर ब्राझिलचा स्टार खेळाडू ख्रिस्तिआनो रोनाल्डो आहे. रोनाल्डोने 19 सामन्यात 14 गोल केले आहेत.