Fifa World Cup 2018: विजयाचे गिफ्ट देणारे आत्मघाती गोल, विश्वचषकात आतापर्यंत ४२ स्वयंगोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 16:43 IST2018-06-16T14:45:54+5:302018-06-16T16:43:56+5:30
विश्वचषकासारखी सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा आणि त्यातील सामन्यात एकच गोल होत असेल, तोसुद्धा सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला आणि तो गोल एखाद्याने स्वत:च्याच संघाविरुद्ध केलेला असेल तर त्याच्याएवढी घोर निराशा दुसरी नाही! अशीच घोर निराशा शुक्रवारी मोराक्कन फुटबॉलप्रेमींच्या पदरात पडली.

Fifa World Cup 2018: विजयाचे गिफ्ट देणारे आत्मघाती गोल, विश्वचषकात आतापर्यंत ४२ स्वयंगोल
- ललित झांबरे
विश्वचषकासारखी सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा आणि त्यातील सामन्यात एकच गोल होत असेल, तोसुद्धा सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला आणि तो गोल एखाद्याने स्वत:च्याच संघाविरुद्ध केलेला असेल तर त्याच्याएवढी घोर निराशा दुसरी नाही! अशीच घोर निराशा शुक्रवारी मोराक्कन फुटबॉलप्रेमींच्या पदरात पडली.
इराकला पूर्ण वेळ गोलशून्य आणि त्यानंतरही अतिरिक्त वेळेत पाचव्या मिनिटापर्यंत बरोबरीत रोखल्यावर नेमक्या अखेरच्या मिनिटाला नको ते घडले. इराणच्या एहसान हाजी साफीने मारलेली किक अडविण्याच्या प्रयत्नात अजीज बहादुजने हेडर मारला खरा, परंतु चेंडू त्यांच्याच गोलजाळ्यात गेला आणि इराणला ध्यानीमनी नसताना विश्वचषकात विजयाचे गिफ्ट मिळाले.
आंद्रेस एस्कोबारची गोळ्या घालून झालेल्या हत्येची उगाच आठवण झाली पण, मोराक्कोच्या पराभवाचे कारण ठरलेल्या या आत्मघाती गोलाचे काय पडसाद तिकडे मोराक्कोत उमटतील ते माहित नाही, परंतु सामन्यात झालेला एकमेव गोल हा आत्मघाती गोल असलेला विश्वचषक इतिहासातील हा केवळ दुसराच सामना आहे.
याआधी २००६ च्या विश्वचषकात पेराग्वेच्या कार्लोस कमाराच्या आत्मघाती गोलमुळे इंग्लंडला असेच विजयाचे गिफ्ट मिळाले होते. कमाराने सामन्याच्या तिसºयाच मिनिटाला ही घोडचूक केली होती परंतु त्यानंतर पूर्णवेळ खेळ होऊनही ते या चुकीची भर काढू शकले नव्हते आणि पेराग्वेला त्या सामन्यात १-० अशी हार पत्करावी लागली होती.
बहादुजचे दु:ख हलके करणारी बाब एकच, ती अशी की अशी स्वयंगोलाची चूक करणारा तो काही पहिलाच मोराक्कन खेळाडू नाही. त्याच्याआधीही १९९८ च्या विश्वचषकात मोराक्कोच्या युसुफ चोप्पोने अशीच चूक केली होती. त्यावेळच्या नियमानुसार मध्यंतरानंतर अतिरिक्त वेळेच्या पहिल्याच मिनिटाला त्याने आपल्याच संघाविरुद्ध गोल करून लढत त्यावेळी १-१ बरोबरीवर आणून ठेवली होती. युसुफच्या सुदैवाने पुढे मोराक्कोने तो सामना २-२ असा बरोबरीत सोडवला होता.
बहादुजच्या आधी विश्वचषक सामन्याच्या अतिरिक्त वेळेत केवळ एकच आत्मघाती गोल झाला होता. तो गेल्या विश्वचषक स्पर्धेत नायजेरियाच्या जोसेफ योबो याने अतिरिक्त वेळेतील दुसऱ्या मिनिटाला फ्रान्सला बहाल केला होता आणि नायजेरियाने तो सामना २-० ने गमावला होता.
नोंदीसाठी म्हणून विश्वचषक फुटबॉलच्या इतिहासात आतापर्यंत ४२ स्वयंगोल नोंदले गेले आहेत आणि असे गोल झालेल्या सामन्यांपैकी ३० सामने चूक करणा-या संघाने गमावले आहेत तर फक्त सहा सामने जिंकले आहेत. उर्वरीत सहा सामने बरोबरीत सोडविण्यात स्वयंगोलाची चूक करणारे संघ यशस्वी ठरले आहेत.