FIFA World Cup 2018 : फर्नांडो हिरोचा कस लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 08:39 IST2018-06-16T08:39:48+5:302018-06-16T08:39:48+5:30
विश्वविजेतेपदाचे दावेदार असलेल्या दिग्गज संघांत स्पेनचा समावेश असल्याने, तसेच स्पर्धेला सुरुवात होत असताना व्यवस्थापनातील उलथापालथीचा परिणाम संघाच्या मनोधैर्यावर होणार नाही, याची त्यांना काळजी घ्यावी लागेल

FIFA World Cup 2018 : फर्नांडो हिरोचा कस लागणार
- सचिन खुटवळकर
सोची- रशियामध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तोंडावर स्पेनच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणून अनपेक्षितपणे जबाबदारी आलेल्या फर्नांडो हिरो यांचा आता खरा कस लागणार आहे.
विश्वविजेतेपदाचे दावेदार असलेल्या दिग्गज संघांत स्पेनचा समावेश असल्याने, तसेच स्पर्धेला सुरुवात होत असताना व्यवस्थापनातील उलथापालथीचा परिणाम संघाच्या मनोधैर्यावर होणार नाही, याची त्यांना काळजी घ्यावी लागेल. अर्थात, या आधी स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनचे स्पोर्टिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळणारे फर्नांडो हिरो प्रत्येक खेळाडूला पूर्णपणे परिचित असल्याने तसेच संघाच्या एकूणच व्यूहरचनेची जाणीव त्यांना असल्याने प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांना फारसे सायास पडणार नाहीत.
स्पेनचे प्रशिक्षक ज्युलन लॉपितेगी यांची नियुक्ती रिअल माद्रिद क्लबच्या प्रशिक्षकपदावर होणार, अशी बातमी येताच स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने त्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली होती.
शुक्रवारी तुल्यबळ पोर्तुगालला रोखण्याचे आव्हान स्पेनसमोर होते. नंतर इराण व मोरोक्कोशी दोन हात करावे लागतील. सर्जिओ रामोस, सर्जिओ बसेक्टस, आंद्रे इनेस्टा असे एकाहून एक अव्वल खेळाडू असलेला स्पेन ब गटातील प्रबळ संघ आहे.
५0 वर्षीय प्रशिक्षक फर्नांडो हिरो यांच्या नियुक्तीबद्दल कप्तान सर्जिओ रामोसने समाधान व्यक्त केले आहे.हिरो यांनी स्पेनसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ८९ सामने खेळले असून त्यात २९ गोल केले आहेत. चार विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळण्याचा त्यांना अनुभव आहे.
रियल माद्रिद क्लबसाठी त्यांनी योगदान दिले असून रियल ओविदो या स्पॅनिश क्लबमध्ये प्रशिक्षण व्यवस्थापन पाहिले आहे.