FIFA World Cup 2018: ‘थकलेल्या’ जर्मनीपुढे लौकिक राखण्याचे आव्हान
By सचिन खुटवळकर | Updated: June 19, 2018 21:21 IST2018-06-19T21:21:55+5:302018-06-19T21:21:55+5:30
ओझिल, म्युलर, क्रुस, खेदिरा हे सर्वजण मेक्सिकन बचाव भेदण्यात अपयशी ठरले. ओझिल गुडघ्याच्या दुखण्यातून नुकताच सावरत असून म्युलर, खेदिरा यांच्या खेळावर वयाचा तसेच शारीरिक थकव्याचा परिणाम दिसून आला.

FIFA World Cup 2018: ‘थकलेल्या’ जर्मनीपुढे लौकिक राखण्याचे आव्हान
सचिन खुटवळकर : गतविजेत्या जर्मनीला तुलनेत कमी वलय असलेल्या मेक्सिकोने फुटबॉल विश्वचषकातील पहिल्या सामन्यात १-0 असे पराभूत करून आश्चर्याचा धक्का दिला. एकापेक्षा एक अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या जर्मनीचा मेक्सिकोपुढे टिकाव न लागल्याने खुद्द मेक्सिकन फुटबॉलप्रेमीच अचंबित झाले. या पराभवामागे जर्मन खेळाडूंच्या शारीरिक थकव्याचे कारण दिले जात आहे. ओझिल, म्युलर, क्रुस, खेदिरा हे सर्वजण मेक्सिकन बचाव भेदण्यात अपयशी ठरले. ओझिल गुडघ्याच्या दुखण्यातून नुकताच सावरत असून म्युलर, खेदिरा यांच्या खेळावर वयाचा तसेच शारीरिक थकव्याचा परिणाम दिसून आला. एकूणच विश्वचषकापूर्वी जवळपास अर्धा डझन सामने गमावणाऱ्या जर्मनीचे मानसिक खच्चीकरणच त्यांना मेक्सिकोसारख्या संघाविरुद्ध पराभवाचे कारण ठरले.
अपयशाचे खापर...
- या पराभवामुळे प्रशिक्षक ज्योकिम लो संघावर नाराज झाले आहेत. आम्ही आमच्या ठरलेल्या व्यूहरचनेनुसारच अखेरपर्यंत खेळत होतो. पहिल्या सत्रानंतर त्यात बदल करण्यात आम्ही अपयशी ठरलो, असे ते म्हणाले.
- जर्मन फॉरवर्ड ओझिल व म्युलर अखेरपर्यंत आपल्या नेहमीच्या वेगवान चाली रचण्यात यशस्वी ठरले नाहीत. मेक्सिकन बचावाचे उत्तर त्यांच्याजवळ नव्हते.
- जर्मनीच्या अतिबचावात्मक पवित्र्यानंतरही मेक्सिकोच्या फॉरवर्डनी अनेकदा जर्मन गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली. त्यातच मेक्सिकोतर्फे एकमेव गोल नोंदविण्यात आला.
- या मानहानिकारक पराभवानंतर जर्मन मीडिया भडकला. पराभवासाठी प्रशिक्षक लो यांच्यासह आघाडीच्या खेळाडूंचा आळशीपणा कारणीभूत ठरल्याचे टीकास्त्र सोडण्यात आले.
- आता जर्मनीची गाठ स्वीडन व दक्षिण कोरियाशी पडणार आहे. पुढील फेरीत पोहोचण्याबरोबरच स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी हे दोन्ही सामने जिंकावे लागतील.