FIFA Football World Cup 2018 : ‘स्टॉपेज टाईम’ : जीवदान मिळण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:25 AM2018-06-27T05:25:00+5:302018-06-27T05:25:09+5:30

स्टॉपेज टाईम’ ठरू लागला आहे जीवदान मिळण्याची वेळ आणि ते नेमके मिळते आहे कोणाला?

FIFA Football World Cup 2018: 'Stop Time': Time to Get Away | FIFA Football World Cup 2018 : ‘स्टॉपेज टाईम’ : जीवदान मिळण्याची वेळ

FIFA Football World Cup 2018 : ‘स्टॉपेज टाईम’ : जीवदान मिळण्याची वेळ

googlenewsNext

रणजित दळवी
स्टॉपेज टाईम’ ठरू लागला आहे जीवदान मिळण्याची वेळ आणि ते नेमके मिळते आहे कोणाला? प्रथम ब्राझील, मग जर्मनी आणि आता स्पेन! बडे संघ! स्पेनला तर त्यासाठी ‘व्हीएआर’वर विसंबून राहावे लागले. बदली खेळाडू इएगो अ‍ॅस्पासने गोल केला, पण तिकडे तो ‘आॅफ साईड’ म्हणून असिस्टंट रेफरीचा झेंडा वर गेला होता. शेवटी गोल ग्राह्य मानला जाताच मोरोक्कोच्या खेळाडूंचा पारा वर गेला. विजय हिरावून घेतला, अशी त्यांची भावना झाली.
अखेरीस जुन्या मॉडेलची स्पॅनिश गाडी चढली बुवा चढाव! ते गतविजेते ठरले, ज्यामुळे त्यांचा मुकाबला आता रशियाशी म्हणजेच यजमानांना लोळविणाऱ्या उरुग्वेशी दोन हात करणे टळले. उरुग्वेने आपला स्टार लुईस सुआरेझ आणि संघभावना या बळावर रशियाला आपली जागा दाखवली.
स्पेनचे आयबेरियातील शेजारी आणि युरोविजेते पोर्तुगाललाही इराण विरुद्ध कडा संघर्ष करावा लागला. बाद फेरी गाठण्यासाठी इराण शेवटपर्यंत लढते. देवत्वाचा दुसरा लाभार्थी रोनाल्डोने आज पेनल्टी वाया दवडली. पण प्रतिस्पर्धी मोर्तझाला जाणूनबुजून कोपर मारणारा रोनाल्डो नशीबवान ठरला. त्याला लालऐवजी पिवळे कार्ड मिळाले.
या दोन्ही प्रसंगांवेळी पॅराग्वेचे रेफरी एनरिके कॅसेरेस यांनी व्हीएआरचा आधार घेतला. हे प्रकरण म्हणजे व्हिडीओचे आता चांगलेच वादग्रस्त आणि क्लेशदायी ठरू लागले आहे. आपल्यावर अन्याय होतो आहे, अशीच भावना त्यामुळे बाधित संघाची होऊ लागली आहे.
पण रोनाल्डोचा त्यात दोष कितीसा? त्याने पेनल्टी दवडली, पण इराणी गोलरक्षक अलिरेझाने अचूक अंदाज बांधला त्याचे काय? त्याच्यासारख्या सहा फुटांहून अधिक उंच गोलरक्षकाच्या डाव्या बाजूस खाली फटका मारणे योग्यच होते. अलिरेझाने या सामन्याच्या सुरुवातीस उंचावरून आलेले चेंडू आपल्या हातून कसे सुटू दिले हे आपण पाहिले. नशीब घेऊन आला होता पठ्ठा! मात्र प्रतिस्पर्ध्याला कोपर मारण्याचा प्रकार अतिशय निंद्य! अखिलाडूपणा तोही टोकाचा! एनरिके कॅसेरेसनी त्याला लाल कार्ड देण्यात कुचराई केली. त्याच्या ‘स्टार’पणापुढे ते नमले! यावर चर्चा आणि वाद तेही तीव्र चालूच राहतील. इकडे स्पेनच्या कामगिरीवर तिखट टीका होईल. निव्वळ ‘टिकी-टाळा’ आणि शैलीदार खेळापेक्षा गोल महत्त्वाचे असतात. त्यांच्या खेळात सुरुवातीपासून विश्वास दिसला नाही. इनिएस्टा आणि आघाडीच्या फळीने भरपूर मेहनत घेतली, पण ती निष्फळ ठरली. प्रतिस्पर्धी बचावावर आवश्यक दबाव त्यांना टाकता आला नाही.
पोर्तुगालची तीच अवस्था होती. रोनाल्डो तर इकडून तिकडे फक्त भटकत होता. शेवटी क्लारेस्माने चलाखीने झक्कास गोल केला. अन्यथा पोर्तुगालला भारी पडले असते. अशा अवस्थेत विलियम कार्व्हालोने मध्यक्षेत्रात भक्कम खेळ करून आक्रमणे जारी ठेवली. त्याच्यावर सक्त पहारा असूनही त्याने आपली भूमिका चोख वठवली. एका वादग्रस्त ‘व्हीएआर’ निर्णयावर इराणला ‘स्टॉपेज टाईम’मध्ये पेनल्टी मिळाली. त्यावर त्यांना फक्त बरोबरीच साधता आली. त्यामुळे त्यांना काही जीवदान मिळू शकले नाही. रोनाल्डो निष्प्रभ ठरूनही पोर्तुगाल वाचला, याचा अर्थ उरुग्वेला आता त्याच्यापासून सावध राहावे लागेल?
स्पेनच्या बचावफळीला झाले तरी काय? रॅमोस, पिके यांनी प्रथम खलिदला आत शिरू दिले. डेहीने पुन्हा आपल्या ढेंगेतून चेंडू जाऊ दिला. पण त्यानंतर एकदा त्याने खलिदचा फटका रोखून धोका टाळल्याबद्दल श्रेय हे द्यायलाच हवे. मात्र स्पेनच्या उंचापुºया बचावफळीने मोरोक्कोच्या युसूफला हवेत उंच झेपावत जी गोल करण्याची संधी दिली हे अगदी अक्षम्य! संघाची गच्छंतीच व्हायची वेळ त्यामुळे ओढवली होती.
स्पेनसाठी इस्को खूप झटला. त्याने बरोबरी तर केलीच, पण त्याचा दुसरा प्रयत्न रोमन साईसने गोलरेषेवर विफल ठरविला व तोंडचा घास पळविला. पिकेनेही कॉर्नरवर शानदार हेडर मारला जो काही इंचांनीच लक्ष्यापासून दूर गेला. तेव्हा तासाच्या ठोक्यावर स्पेनला आघाडी मिळाली असती, तर सामन्याचे चित्र पूर्ण बदलले असते.

Web Title: FIFA Football World Cup 2018: 'Stop Time': Time to Get Away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.