FIFA Football World Cup 2018 : उपांत्यपूर्व फेरीच्या थराराची सुरुवात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 00:05 IST2018-07-06T00:04:42+5:302018-07-06T00:05:25+5:30
फिफा विश्वचषक स्पर्धा आता अत्यंत रोमांचक वळणावर आली असून शुक्रवारपासून उपांत्यपूर्व फेरीच्या थराराला सुरुवात होईल. गेल्या तीन आठवड्यांमध्ये उच्च दर्जाचा खेळ, जबरदस्त उत्सुकता, थोडेफार वाद आणि काही अनपेक्षित निकाल अनुभवण्यास मिळाले.

FIFA Football World Cup 2018 : उपांत्यपूर्व फेरीच्या थराराची सुरुवात...
अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
फिफा विश्वचषक स्पर्धा आता अत्यंत रोमांचक वळणावर आली असून शुक्रवारपासून उपांत्यपूर्व फेरीच्या थराराला सुरुवात होईल. गेल्या तीन आठवड्यांमध्ये उच्च दर्जाचा खेळ, जबरदस्त उत्सुकता, थोडेफार वाद आणि काही अनपेक्षित निकाल अनुभवण्यास मिळाले.
कोणी कल्पना केली असेल की, गतविजेते जर्मनीचे आव्हान साखळी फेरीतच संपेल? किंवा स्पेन, अर्जेंटिना आणि पोर्तुगाल यांसारख्या काही संभाव्य विजेत्या संघांचे आव्हान उप-उपांत्यपूर्व फेरीतच संपेल याचाही कोणी विचार केला नसेल.
त्याचबरोबर ज्या संघांकडून साखळी फेरी पार होण्याची अपेक्षा बाळगली नव्हती, अशा काही संघांनी थेट अव्वल ८ स्थानांमध्ये जागा मिळवत सर्वांनाच चकित केले. यामध्ये नक्कीच स्वीडन, क्रोएशिया आणि यजमान रशिया यांचा उल्लेख करावा लागेल. या सर्वांमध्ये यजमान रशियाची कामगिरी अत्यंत लक्षवेधी ठरणारी आहे. कारण ते जागतिक क्रमवारीत ७०व्या स्थानी आहेत. यावरूनच घरच्या प्रेक्षकांकडून मिळणारा पाठिंबा किती महत्त्वाचा असतो हे कळून येतं.
इंग्लंडनेही शानदार कामगिरी करताना कोलंबियाचे आव्हान उप-उपांत्यपूर्व फेरीत पेनल्टी शूटआउटद्वारे परतावले. इंग्लंडसाठी ही एक नाट्यमय वाटचाल ठरली. त्यांच्याकडून नेहमीच खूप अपेक्षा असतात, पण गेल्या तीन दशकांपासून इंग्लंड संघ निराशा करत आला आहे. त्याचबरोबर थोड्याशा नशिबाची साथ मिळाल्याने जपाननेही बाद फेरी गाठली. बेल्जियमने ९४व्या मिनिटाला केलेला गोल केवळ जपानसाठीच नाही, तर जगातील फुटबॉलप्रेमींसाठी ‘हार्टब्रेकिंग’ ठरला. थोडक्यात या सामन्यातून लॅटिन अमेरिका आणि युरोपची असलेले फुटबॉलवरील वर्चस्व भविष्यात कमी होईल, याची चाहूल लागली आहे.
खेळाडूंविषयी सांगायचे झाल्यास, विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व जगाचे लक्ष लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या कामगिरीवर लागले होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे पृथ्वीतलावरील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून पाहण्यात येते आहे आणि ही स्पर्धा या दोघांमधील अंतर ठरविण्यासाठी टाय - ब्रेकर ठरणार होती. परंतु, दुर्दैवाने दोघांनाही उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले नाही. दोघांनीही आपला लौकिक दाखवला, पण प्रतिस्पर्धींनी दोघांना कोंडीत पकडले. त्यामुळे विश्वचषक जेतेपदाविना दोघांच्या महानतेविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे ब्राझीलचा नेमार थोडा उजवा ठरला. सुरुवातीला त्याचे दुखापतग्रस्त असणे संघासाठी चिंतेचा विषय ठरला होता, पण यानंतर त्याने चमकदार कामगिरी केली. मात्र तो संघाला अंतिम फेरीत नेऊन जगज्जेतेपद मिळवून देईल का?