उल्हासनगर संघाला विजेतेपद; अन्सारी सर्वोत्तम खेळाडू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 15:22 IST2020-01-03T15:22:00+5:302020-01-03T15:22:25+5:30
बिपिन फुटबॉल अकादमी आंतरकेंद्र स्पर्धा

उल्हासनगर संघाला विजेतेपद; अन्सारी सर्वोत्तम खेळाडू
मुंबई : बिपिन फुटबॉल अकादमीच्या ३३व्या आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद उल्हासनगर केंद्राने पटकाविले. कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या मैदानावर दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टायब्रेकरमध्ये उल्हासनगरने कुलाबा संघाला ५-४ अशा फरकाने पराभूत केले. निर्धारित वेळेत दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. मात्र शूटआऊटमध्ये कुलाबा संघाच्या प्रेम के. याने मारलेली किक हुकली आणि उल्हासनगर संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. उल्हासनगर संघाचा नझीर अन्सारी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला तर कुलाबा संघाचा दीपक वर्मा याला सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले.
प्रोकॅमचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग तसेच एडलवाईजचे उप उपाध्यक्ष विनित अमिन यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
त्याआधी, सकाळी झालेल्या उपांत्य सामन्यात उल्हासनगर संघाने मिरा रोड संघावर २-० अशी मात करत अंतिम फेरीत धडक मारली. तर कुलाबा संघाने पेनल्टीच्या आधारावर बीएमसी संघावर मात करत अंतिम फेरी गाठली.
अंतिम निकाल
उल्हासनगर संघ ५ (झकारिया मोहम्मद, हिमांशू मराठे, नझीर अन्सारी, प्रणव देशमुख, आदित्य कदम) टायब्रेकरमध्ये विजयी वि. कुलाबा संघ ४ (कौस्तुभ मेहेर, विष्णू राठोड, विकी जाधव, उमेश राठोड). उपांत्य फेरी : उल्हासनगर २ (निखिल आर. शिवा एम.) वि. वि. मिरा रोड ०, कुलाबा ३ (प्रेम एम. विकी जे, कौस्तुभ मेहेर) टायब्रेकरमध्ये विजयी वि. बीएमसी २ (विजू पवार, संजय राठोड).