बंगळुरू एफसीने वाढवला छेत्रीसोबतच करार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 15:27 IST2018-07-25T15:27:11+5:302018-07-25T15:27:41+5:30
फुटबॉलमध्येअल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या बंगळुरू फुटबॉल क्लबने भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीसोबतच्या कराराचे नूतनीकरण केले असून तो २०२१ पर्यंत संघासोबत असणार आहे.

बंगळुरू एफसीने वाढवला छेत्रीसोबतच करार
पणजी : फुटबॉलमध्येअल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या बंगळुरू फुटबॉल क्लबने भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीसोबतच्या कराराचे नूतनीकरण केले असून तो २०२१ पर्यंत संघासोबत असणार आहे. क्लबकडून ही घोषणा करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, यंदा सुनीलने एआयएफएफचा सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा मानही मिळवला आहे.
देशांतर्गत आय लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद तसेच इंडियन सुपर लीग चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्यात सुनील छेत्री याने महत्त्वाची भूमिका बंगळुरू फुटबॉल क्लब संघासाठी वठवलेली आहे. तसेच एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेतही त्याने महत्त्वाच्या सामन्यांत गोल करून संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्याच कर्णधारपदाखाली बंगळुरू फुटबॉल क्लब संघाने यंदाच्या स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. तर त्यापूर्वी अंतिम फेरी गाठली होती.
दरम्यान, सुनील छेत्रीने बंगळुरू फुटबॉल क्लब संघाचे प्रतिनिधित्व करताना १४४ सामन्यांतून ७१ गोलची नोंद केली आहे. तर देशासाठी खेळताना त्याने १०१ सामन्यांतून ६४ गोलची नोंद केली आहे. व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेत कोलकात्याच्या मोहन बगान संघाकडून २००२ पासून त्याने सुरुवात केली होती. त्यानंतर जेसीटी फुटबॉल क्लब, इस्ट बंगाल, धेंपो फुटबॉल क्लब, चिराग युनायटेड, मुंबई सिटी यांसह देशातील इतर क्लब संघांसाठी तो खेळला आहे.