टेस्टी कट्टा : अमृतासमान आरस्पानी इमरती, जिलेबीचा कलात्मक आविष्कार
By राजू इनामदार | Updated: August 20, 2022 13:28 IST2022-08-20T13:26:42+5:302022-08-20T13:28:19+5:30
पुण्याची प्रसिद्ध आरस्पानी इमरती...

टेस्टी कट्टा : अमृतासमान आरस्पानी इमरती, जिलेबीचा कलात्मक आविष्कार
पुणे : साधे उडदाच्या डाळीचे पीठ; पण त्याला उत्तम बल्लवाचार्यांचा हात लागला, तर काय होऊ शकते, याचे कलात्मक उदाहरण म्हणजे इमरती. खरेतर, ही जिलेबीच. पण, साध्या डाळीच्या पिठाच्या वाकड्यातिकड्या वेटोळ्यांपेक्षा कितीतरी सुंदर, रेखीव. पाहताक्षणीच आकर्षून घेणारी.
उडदाची डाळ चांगली रात्रभर भिजवून घ्यायची. सकाळी तिच्यातील सगळे पाणी काढून टाकायचे व मिक्सरवर वाटून घ्यायची. तयार झालेले पीठ त्यात केशर किंवा मग खाण्याचा रंग घालून चांगले फेटायचे, म्हणजे अगदी मऊसूत पेस्ट होईल असे. साजूक चूप कढईत चांगले तापवायचे. त्याआधी साखरेमध्ये पाणी घालून ते तापवून असा पाक तयार करून घ्यायचा. ही इमरतीची पूर्वतयारी.
त्यानंतर स्वच्छ जाड कापड घेऊन त्याचा त्रिकोण करून घ्यायचा. त्याला बरोबर खाली थोडे मोठे असे छिद्र राहायला हवे. त्रिकोणात पेस्टसारखे झालेले, चांगली तार येत आहे असे पीठ भरून घ्यायचे. इमरती टाकायला कौशल्य लागते. आधी साधा वेढा, मग त्यावर वेटोळे व वर परत साधा वेढा. हे सगळे उकळत्या तुपात करायचे म्हणजे भलतीच एकाग्रता लागते. त्यातूनच मग एकसारख्या आकाराची, तोड्यासारखी दिसणारी इमरती तयार होते.
तळून तयार झालेली इमरती मग पाकाच्या कढईत बुडवून बराच वेळ ठेवायची. लहानलहान छिद्र असतात, त्यात पाक जातो व इमरती पाकामध्ये चांगली मुरते. तिच्या नसानसांत गोडवा भरतो. एखादा हलवाई भगव्या रंगाची ही इमरती चवड लावून ताटामध्ये ठेवून तिच्याभोवती पिवळ्या रंगाचा जिलेटिन पेपर गुंडाळतो त्यावेळी ती दुकानातील एकजात सगळ्या मिठाईच्या तोंडात मारते.
मुघलांनी इथे राहून काय राजकीय गोष्टी केल्या असतील त्या केल्या; पण, त्यांनी खाद्यपदार्थांमध्ये जे काही करून ठेवले आहे त्याला तोड नाही. इमरती हीही त्यांचीच देण. त्यांच्या एका युवराजाला म्हणे गोडाचा काहीतरी वेगळा पदार्थ हवा होता. त्यावेळी तिथल्या खानसाम्याने डोके लढवून ही इमरती तयार केली. इतकी शतके झाली तरी टिकून आहे.
कुठे खाल - कलकत्ता विहार - दगडूशेठ गणपतीची आरास असते तिथे. १९३९ पासूनचे दुकान आहे.
कधी - दिवसभरात केंव्हाही. विशेष करून सणासुदीच्या दिवशी.