चविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 15:35 IST2018-09-25T15:33:28+5:302018-09-25T15:35:27+5:30
आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कबाब खाल्ले असतील. अनेकदा कबाब खाण्यासाठी एखाद्या हॉटेलचा किंवा रेस्टॉरंटचा आधार घेण्यात येतो. पण तुम्ही घरच्या घरी अगदी सहज चविष्ट आणि पौष्टीक असे कबाब बनवू शकता.

चविष्ट आणि पौष्टीक असे मटर पनीर कबाब!
आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कबाब खाल्ले असतील. अनेकदा कबाब खाण्यासाठी एखाद्या हॉटेलचा किंवा रेस्टॉरंटचा आधार घेण्यात येतो. पण तुम्ही घरच्या घरी अगदी सहज चविष्ट आणि पौष्टीक असे कबाब बनवू शकता. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांचाही आधार घेऊ शकता. जाणून घेऊयात घरच्या घरी अगदी सहज करता येणारी मटर पनीर कबाब तयार करण्याची रेसिपी. मुलांच्या डब्ब्यामध्ये रोजच्या पोळी-भाजीपेक्षा वेगळं काहीतरी द्यायचं असल्यासही हे कबाब तुम्ही ट्राय करू शकता.
साहित्य :
- 250 ग्रॅम मटार दाणे
- 200 ग्रॅम पनीर
- 5-6 ब्रेडचे स्लाईस
- 1 चमचा खसखस
- 2 चमचे कॉर्नफ्लोअर
- लसणाच्या काही पाकळ्या
- 1 कांदा
- 1 चमचा गरम मसाला
- पुदिन्याची पाने
- तळण्यासाठी तेल
- चवीपुरते मीठ
कृती :
- सर्वप्रथम मटार दाणे, पनीर आणि ब्रेडचे स्लाईसेस मिक्सरमधून वेगवेगळे वाटून घ्यावेत.
- त्यानंतर हिरव्या मिरच्या, खसखस, लसूण, कांदा, पुदिन्याची पाने यांची पेस्ट बनवून घ्यावी.
- वरील सर्व साहित्य, मीठ आणि गरम मसाला त्यात एकत्र करुन हे मिश्रण मळून घ्यावे.
- त्यानंतर या मिश्रणाचे जरा लांब आकाराचे गोळे करुन घ्या.
- कॉर्नफ्लोअरमध्ये तयार गोळे घोळवून गरम तेलात लालसर तळून घ्यावेत.
- हे गरमागरम कबाब टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करू शकता.