भूक लागली? - खा, ताफ्तून आणि लवाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 09:40 IST2025-01-24T09:40:01+5:302025-01-24T09:40:37+5:30
Food: बऱ्याच वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका काॅलनीतल्या एकमेव किराणा मालाच्या दुकानात दोन इराणी मुली एका पाकिटात असलेल्या कापडासारख्या दिसणाऱ्या कुठल्यातरी वस्तू घेऊन जाताना दिसल्या.

भूक लागली? - खा, ताफ्तून आणि लवाश
बऱ्याच वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका काॅलनीतल्या एकमेव किराणा मालाच्या दुकानात दोन इराणी मुली एका पाकिटात असलेल्या कापडासारख्या दिसणाऱ्या कुठल्यातरी वस्तू घेऊन जाताना दिसल्या. त्यांच्याकडून समजलं की तो इराणी ब्रेड ‘ताफ्तून’ आहे. पुढे याविषयी वाचताना असं समजलं की ताफ्तून हा फारसी शब्द ताफन म्हणजेच भाजणे. शहानाम्यातही याविषयी उल्लेख आढळतो.
ताफतान नावाचं बलूचिस्तानमध्ये एक लहानसं गावही आहे. जे इराणला लागूनच आहे. त्यामुळे असाही प्रवाद आहे की या ब्रेडचा शोध बलूचमध्ये लागला असेल. तिथून व्यापाऱ्यांबरोबर प्रवास करत हा नान भारतात पोहोचला. मैदा, दूध, अंडी किंवा तेल, बटर वापरून हा नान तयार केला जातो. प्रवासातही चार-आठ दिवस टिकतो म्हणूनच व्यापाऱ्यांची या नानला पसंती असावी. हा नान गरम हवेतही जास्त काळ टिकतो.
इराणमधलाच दुसरा आणखी एक महत्त्वाचा नान म्हणजे लवाश. मल्टीकुझिन हाॅटेलात गेल्यावर तिथल्या मेनूमध्ये लवाशचं नाव दिसतं. पण, इथं मिळणारा लवाश हा खाकऱ्याप्रमाणे कडक असतो. तो मूळ लवाशचे हव्या त्या आकारात तुकडे करून ते तळून किंवा भट्टीत पुन्हा एकदा भाजून कुरकुरीत करून घेतात. याचं मूळ तुर्कस्तान आणि अर्मेनियात आहे, असं म्हणतात. हा नान यीस्ट वापरून मैद्याचं पीठ फर्मेंट करून केला जातो. आपल्याकडे उन्हाळी वाळवणाला गल्लीतील बायका एकत्र जमून पापड करतात तसंच इराण, तुर्कस्तान, अर्मेनियात बायका कुणा एकीकडे जमतात आणि गप्पागोष्टी करीत भरपूर नान लाटून भट्टीत भाजून ठेवतात. हे नान सहा महिने टिकतात. लंबगोल, पूर्णगोल, चौकोनी असा हा नान लाटला जातो. नान फुगू नये म्हणून यालाही टोचे मारले जातात. हा नान तिथल्या संस्कृतीचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच २०१४मध्ये लवाश नानला युनेस्कोने त्यांच्या ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ यादीत अव्वल स्थान दिलं आहे.
- अवंती कुलकर्णी
( खाद्यसंस्कृती अभ्यासक)
avanti.3110@gmail.