आज रविवार! सकाळी सकाळी नाष्ता काय बनवायचा असा विचार प्रत्येक घरातील महिलांच्या डोक्यात चालला आहे. आठवड्यातले सगळे दिवस पोहे, उपमा खाऊन कंटाळलेल्या घरातल्या मोठ्यांना तसचं बच्चे कंपनीला काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होत असते. त्याचप्रमाणे ऐरवी सकाळीच कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिला आज घरी असल्यामुळे त्यांना घरातल्या मंडळींची फर्माईश पूर्ण करावी लागणार. जर तुम्ही सुध्दा असा विचार करत असाल, तर झटपट तयार होणारी एक आगळीवेगळी रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कशी तयार करायची ब्रेड रोलची रेसिपी. 


साहीत्यः
४ मोठे बटाटे
१ टे. स्पू बारीक चिरलेली कोथिंबीर
१/२ लिंबाचा रस
६-८ ब्रेड स्लाईसेस
वाटणासाठी
१ इंच आलं
४ मोठ्या लसूण पाकळ्या
३-४ हिरव्या मिरच्या
१ टि. स्पू. धने
१ टि. स्पू. जीरे
१ टि. स्पू. बडिशेप

कव्हरसाठी:
१ कप डाळीचं पीठ
१ मोठा चमचा तांदळाचं पीठ
१ टि. स्पू. तिखट
१/२ टि. स्पू. हळद
चिमूटभर हिंग
१ छोटा चमचा आलं लसूण पेस्ट
चवी प्रमाणे मीठ

हिरवी चटणी:
एक छोटी कोथिंबीरीची जुडी
मूठभर पुदिना पानं
१-२ पाकळ्या लसूण
१/२ इंच आलं
३-४ हि. मिरची
१ टि. स्पू. जीरे
१/२ टि. स्पू. अनारदाणे (असल्यास)
पाव लिंबाचा रस
चवीप्रमाणे मीठ
तळायला तेल
गोड चटणी
बारीक चिरलेला कांदा
बारीक शेव

कृती: 
हिरव्या चटणीसाठी दिलेले साहित्य बारिक वाटून घ्या. चटणी बाजूला ठेवा.
डाळीच्या पीठात सर्व साहित्य घालून भजींच्या पीठाप्रमाणे सरबरीत भिजवून घ्या पण खूप पातळ करू नका.
बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या.
वाटणासाठी दिलेले सर्व पदार्थ बारिक वाटून थोड्या गरम तेलात परतून घ्या. त्यातच हळद घाला.
बटाट्यामधे तेलात परतलेले वाटण, मीठ, बारिक चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
ब्रेडच्या कडा काढून  स्लाईस लाटण्यानं लाटून घ्या.
ब्रेडला हिरवी चटणी लावून बटाट्याचे सारण एका कडेला ठेवून दुसरी बाजू त्यावर घडी घालून पॅटीस सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करून घ्या.
डाळीच्या पीठात बुडवून तळून घ्या.
तळलेल्या पॅटीसचे तिरके काप करून घ्या.
त्यावर मीठ, धने-जीरे पूड, तिखट घालून थोडी गोड चटणी घाला.
कांदा घालून वरून बारीक शेव घाला. तयार आहेत ब्रेड रोल . हा पदार्थ तुम्ही सॉस किंवा चटणी सोबत खाऊ शकता.

(सौजन्य- maayboli)

Web Title: How to make bread rolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.