होळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळ्यांच्याच घरी पुरणपोळी तयार केली जाते. महिलांची पुरणपोळी तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. पोळ्या मऊ आणि तोंडात टाकल्याबरोबरचं जीभेवर विरघळतील अशा असाव्यात. कारण आपण कितीही जरी बाहेरचं खाण्याचा आणि बाहेरचं मागवण्याचा अट्टहास केला तरी घरी तयार करून इतरांना खाऊ घालण्याची मजा काही वेगळीच असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पुरणपोळ्या मऊ कशा करायच्या ते सांगणार आहोत.
पुरणपोळीची सुरुवात पुरणापासून होते. त्यासाठी चणाडाळ अगदी उत्तम शिजवून चाळणीत घालून निथळून घेतलेली असते. निथळून घेतलेल्या डाळीमध्ये बारीक चिरलेला गूळ घालून पातेलं मंद विस्तवावर ठेवलं जातं. हळूहळू गूळ विरघळून डाळीशी एकजीव होऊ लागतो. प्रथम जरा पातळ होऊन पुरण हळूहळू घट्ट होऊ लागतं.
चाळून घेतलेली बारीक, मऊ कणीक असेल तर तार सुटण्यात अडचण येत नाही. मैद्यामध्ये कोंडा आणि बीज अजिबात नसल्यानं त्याला लवकर तार सुटते म्हणून काही ठिकाणी कणीक आणि मैदा किंवा रवा आणि मैदा पिठासाठी घेतले जातात. या कणकेची दोन रुपयाच्या नाण्याएवढी गोळी घेऊन तांदळाच्या पिठात बुडवून त्यावर त्याच्या तिप्पट ते चौपट मोठा पुरणाचा गोळा ठेवून हळूहळू पारी मोठी करून सर्व पुरण आत घालून पारी बंद करायची. तांदळाच्या पिठात घोळवून पोळपाटावर हातानं हलके सर्व बाजूंनी थापून पोळी मोठी करायची आणि मग खाली-वर तांदळाची पिठी घालून पोळी लाटण्यानं लाटून मोठी करायची. ( हे पण वाचा-फक्त ७ दिवस दुधासोबत सुंठाचं सेवन कराल तर 'हे' आजार कधी दूर होतील कळणार सुद्धा नाही)
पुरणपोळी भाजताना तव्याखाली विस्तव मध्यम हवा. तव्यावर पोळी वरची बाजू वरच ठेवून टाकायची. थोड्या वेळानं उलटून टाकायची. त्या पृष्ठभागावरील तांदळाचं पीठ मऊ रूमालानं काढून टाकावं. अशाप्रकारे पोळी दोन्ही बाजूंनी सोनेरी लालसर झाली की कागदावर काढून घेऊन दुसऱ्या मोठ्या कागदावर गार होण्यासाठी ठेवावी. गार झाल्यावर पोळ्या डब्यात भराव्यात. तयार आहेत पुरणपोळ्या. ( हे पण वाचा-चौपाटी स्टाईल चटपटीत, चमचमीत चना चाट घरी बनवून तर बघा !).