गरमागरम पुलाव आवडतो ना?; पण हा पदार्थ अन् शब्द आलाय कुठून माहित्येय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 14:02 IST2019-08-16T13:55:10+5:302019-08-16T14:02:21+5:30
आपल्या अनेक समारंभांच्या मेन्यूमध्ये हमखास स्थान मिळवलेला पुलाव हा महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ नाही.

गरमागरम पुलाव आवडतो ना?; पण हा पदार्थ अन् शब्द आलाय कुठून माहित्येय का?
>> साधना गोरे
मुलांनो, पुलाव हा महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ नाही. तरी अलीकडे आपल्या खास समारंभामध्ये खाद्यपदार्थांच्या यादीत पुलावाला हमखास स्थान असतेच असते. पुलाव हा मूळचा मुस्लीमधर्मीय खाद्यपदार्थ. त्यामुळे ‘पुलाव’ हा शब्दही मुस्लीम धर्मियांच्या फारसी किंवा अरबी भाषेतील असेल असं तुम्हाला वाटलं असेल ना! मग तुम्ही साफ चुकीचे आहात.
खरं तर ‘पुलाव’ हा शब्द संस्कृत भाषेतील. मनाच्या अत्यानंदित अवस्थेला पुलक किंवा पुलकित असं म्हटलं जातं. आनंदाच्या या अवस्थेत सगळं शरीर रोमांचित होतं, मोहरून येतं. आणखी सोप्या शब्दात सांगायचं तर अंगावर काटा येतो, अंगावरचा केस न् केस उभा राहिलेला दिसतो. हे काटा येणं म्हणजेच पुलक, म्हणजेच रोमांच. हाच पुलक जेव्हा एखाद्याच्या चेहऱ्यावर दिसतो त्याचा चेहरा खुललेला असतो, मोहरलेला असतो.
आपल्या स्वयंपाकघरात फोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या मोहरीलाही संस्कृतमध्ये पुलक: म्हटलं जातं. मोहरीचे दाणे ताटात ठेवून पाहा. ते एका जागी स्थिर राहत नाहीत. अन् चुकून ती तुमच्या हातून जमिनीवर सांडली तर... ही मोहरलेली मोहरी हातात येता येत नाही. गरम तेलात टाकलेली मोहरी जणू तिच्या मोहरण्याचं उत्कट रूपच! तिचं मोहरी हे नावही किती सार्थ!
याच पुलकपासून तयार झालेला शब्द म्हणजे पुलाकम्, याचा अर्थ तांदूळ. अरबांचा पुलाव आज स्पेन अन् पूर्ण युरोपभर पोचलेला आहे. पुलाव या खाद्यपदार्थाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सुगंध अन् त्याचा शीत न् शीत मोहरून येणं. आता जेव्हा तुम्ही पुलाव खाल तेव्हा पुलकित व्हालंच अशी अपेक्षा आहे.
(लेखिका मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यकर्त्या आहेत.)