वेगन डाएट करताय?; मँगो आईस्क्रीम खावंसं वाटतंय?... मग, दूध-साखरेविना आईस्क्रीमची ही रेसिपी नक्की ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 16:21 IST2021-05-05T19:49:03+5:302021-05-06T16:21:53+5:30
तुम्ही वेगन पलेओ डाएट करताय? तुम्हीही हा मँंगो आईसक्रीमचा थंडावा अनुभवू शकता. कसा?... आमच्याकडे आहे एक चविष्ट उपाय.

वेगन डाएट करताय?; मँगो आईस्क्रीम खावंसं वाटतंय?... मग, दूध-साखरेविना आईस्क्रीमची ही रेसिपी नक्की ट्राय करा!
फळांचा राजा आंबा म्हणजे सर्वांचाच जीव की प्राण. उन्हाळ्यात या आंब्याचं आईस्क्रीम पाहिल्यावर कोणाच्याही तोंडाला सहज पाणी सुटेल. तुम्ही वेगन पलेओ डाएट करत असाल, तरीही तुम्ही हा आंब्याचा थंडावा अनुभवू शकता. कसा?... आमच्याकडे आहे एक चविष्ट उपाय. आंब्याचं पलेओ आईस्क्रीम. यात दुधाचा थेंबही नाही की साखरही नाही.
आता आपल्यापैकी काही जणांना प्रश्न पडला असेल की वेगन पलेओ डाएट म्हणजे काय?
तर पलेओ डाएट म्हणजे आदिमानव खायचा ते अन्न. शेतीचा शोध लागण्याआधी आदिमानव झाडावरची फळं, कंदमुळं, मांस या अन्नावर जगायचा. सध्या जे पलेओ वेगन डाएट केलं जातं ते म्हणजे जास्तीतजास्त भाज्या आणि फळं खायची. यातून दूध, दुग्धजन्य पदार्थ, तसेच प्रक्रिया केलेलं अन्न पूर्णपणे वर्ज्य असतं.
आता तुम्ही म्हणाल दुधाशिवाय आईस्क्रीम शक्यच नाही. मग, ही रेसिपी वाचाच.
थंडगार केळी मिक्सरमध्ये जाडसर मिश्रण होईल अशी वाटून घ्यायची. यामध्ये केळी दुधाचं काम करतात. त्यानंतर त्यात आंब्याच्या फोडी बारीक करून केलेलं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. त्यावर बदामाचे काप टाकून थंडगार सर्व्ह करायचं. ना साखर ना बर्फ. कारण केळी थंडगारच घ्यायची आणि आंबे गोड असतातच, मग साखरेची गरज काय?
त्यामुळे वेगन डाएट करणाऱ्यांनीच नव्हे, तर सर्वांनीच या उन्हाळ्यात ही थंडगार ट्रीट चाखून पाहाच.