'लग्नानंतर त्याचं सत्य कळलं, तो..'; एक्स पतीविषयी शुभांगी अत्रेने केला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 10:21 IST2026-04-17T10:20:09+5:302026-04-17T10:21:09+5:30
Shubhangi atre: २०२५ मध्ये शुभांगीने तिचा २२ वर्षांचा संसार मोडला. या घटस्फोटाविषयी बोलत असतांना तिने तिच्या पतीबद्दल काही खुलासे केले.

'लग्नानंतर त्याचं सत्य कळलं, तो..'; एक्स पतीविषयी शुभांगी अत्रेने केला धक्कादायक खुलासा
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, तिला खरी ओळख मिळाली ती भाबीजी घर पर हैं या सुपरहिट ठरलेल्या मालिकेमुळे. या मालिकेत अंगुरी भाभी या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. पडद्यावर सगळ्यांचं मनोरंजन करणाऱ्या शुभांगीच्या खऱ्या आयुष्यात अनेक चढउतार आले. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीविषयी भाष्य केलं.
शुभांगीने नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या घटस्फोटाविषयी भाष्य केलं. २०२५ मध्ये शुभांगीने तिचा २२ वर्षांचा संसार मोडला. या घटस्फोटाविषयी बोलत असतांना तिने तिच्या पतीबद्दल काही खुलासे केले. यात लग्नानंतर तिला तिच्या नवऱ्याच्या वाईट सवयींविषयी समजलं होतं असंही ती यावेळी म्हणाली.
''आम्ही दोघेही शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखत होतो. त्यानंतर एकमेकांना डेट करायला लागलो. माझ्या घरी माझ्या लग्नाची बोलणी सुरु झाली होती. त्याचवेळी मी त्यांना पियुषविषयी सांगितलं आणि त्यांची ओळख करुन दिली. माझ्या घरातलेही लगेच तयार झाले आणि आमचं लग्नही छान झालं. पण, त्याच्यासोबत राहूनदेखील मला त्याच्या दारुच्या व्यसनाविषयी माहित नव्हतं. लग्नानंतर मला त्याच्या या व्यसनाविषयी कळलं'', असं शुभांगी म्हणाली.
पुढे ती म्हणते, ''पियुष प्रचंड दारुच्या आहारी गेला होता. पण, जबाबदारी आल्यावर किंवा वेळेनुसार हळूहळू त्याचं व्यसन कमी होईल असं मला वाटलं होतं. पण, तसं काहीच झालं नाही. माझं लग्न टिकावं यासाठी मी कसोशीने प्रयत्न केला. जवळपास १७ वर्ष आम्ही एकत्र होतो. मी माझ्या कामात बिझी असायचे त्यामुळे त्याच्या व्यसनाची स्थिती हाताबाहेर कधी गेली हे कळलंच नाही. माझी मुलगी आशी मला त्याच्या दारु पिण्याविषयी सतत सांगायची. तो दारु प्यायला की चिडचिडा होतो हे सुद्धा सांगायची. पण, ज्यावेळी मी कोविडच्या काळात त्याची सत्य परिस्थिती पाहिली त्यावेळी मला धक्काच बसला.''
स्टेरॉयड्स घेतांना पण करायचा दारुचं व्यसन
''पियुषने २०१८ पासून स्टेरॉयड्स घ्यायला सुरुवात केली होती. मात्र, याच्यासोबतही तो दारुच प्यायचा. ज्यामुळे त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्याला त्यावेळी रुग्णालयात अॅडमीट करावं लागलं होतं. डॉक्टरांनी दारु पिऊ नका अशी सक्त ताकीद दिली होती. मात्र, तरीदेखील त्याचं पिण्याचं प्रमाण कमी झालं नव्हतं.''
२०२० मध्ये घेतला घटस्फोटाचा निर्णय
''मी जवळपास २ वर्ष त्याला समजवायचा प्रयत्न केला. रिहॅब सेंटर, घर जसं शक्य होईल तसं त्याला समजावत गेले. पण, काही फायदा झाला नाही. शेवटी नोव्हेंबर २०२० मध्ये मी त्याच्यापासून स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या गोष्टीचा माझ्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला. घटस्फोटानंतरही मी त्याला आर्थिकदृष्ट्या मदत केली. पण, त्याचं दारु पिणं तेव्हाही थांबलं नव्हतं.''
२०२५ मध्ये झाले कायदेशीररित्या विभक्त
शुभांगी आणि पियुषने २००३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र, त्यांचा हा संसार २०२५ मध्ये मोडला. ही जोडी कायदेशीररित्या विभक्त झाली. त्यानंतर पियुषचं दारुमुळे आणि मल्टिपल ऑर्गन फेलियरमुळे २०२५ मध्येच निधन झालं.