विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमध्ये अडकला, रडतच सांगितली परिस्थिती; म्हणाली. "गेले ४ दिवस तो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:54 IST2026-03-03T12:50:31+5:302026-03-03T12:54:08+5:30
विशाखाच्या या व्हिडीओवर मराठी कलाकारांनी कमेंट करत तिला धीर दिला आहे.

विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमध्ये अडकला, रडतच सांगितली परिस्थिती; म्हणाली. "गेले ४ दिवस तो..."
सध्या काही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे सगळेच चिंतेत आहेत. इराण विरुद्ध इस्राईल-युसएमध्ये सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे दुबई आणि इतर गल्फ देशांमध्येही हल्ले होत आहेत. मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा अभिनय सुभेदार काही दिवसांपूर्वी लंडनला निघाला होता. तिथलं शिक्षण पूर्ण करुन तो भारतात आला होता आणि परत लंडनला जाणार होता. विशाखा आणि तिचे कुटुंबीय त्याला विमानतळावर सोडण्यासाठीही गेले होते हे आपण सोशल मीडियावरुन पाहिलं होतं. मात्र आता अभिनयचं विमान लंडनला न जाता कुवेतमध्येच उतरलं आणि तो तिथेच अडकला असल्याची माहिती विशाखाने व्हिडीओ शेअर करत दिली आहे. अभिनयसाठी तिचा जीव तुटत आहे आणि रडतच तिने मुख्यमंत्र्यांकडे मदतीचं आवाहन केलं आहे.
विशाखा सुभेदार मुलाच्या काळजीमुळे अस्वस्थ झाली आहे. व्हिडीओ शेअर करत तिने संपूर्ण परिस्थिती सांगितली. ती म्हणाली, "नमस्कार! मी विशाखा सुभेदार. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे...माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता. मात्र कुवेतमध्ये lay over असल्यामुळे त्याचं फ्लाईट तिथे उतरवण्यात आलं. गेले चार दिवस एअर स्पेस नसल्याने सगळ्या देशाला माहित आहे विमानं रद्द करण्यात आली आहे. माझा मुलगा चार दिवसांपासून कुवेतमध्ये अडकला आहे. आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली आहे हे आपण बातम्यांमधून पाहतोय. तो स्वत: तिथे अनुभवतोय. तिथे हल्ले होत आहेत. एअरलाईनने आत्ता त्यांची हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. इंडियन अँबेसीने व्यवस्था केली आहे."
ती पुढे म्हणाली,"पण आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. दुबईच्या लोकांना परत आणलं गेलं तसंच कुवेतमध्येही भारतीये अडकलेत त्यांना परत आणावं. ही माझी कळकळीची विनंती आहे. अनेक पोरांच्या आया, अनेक कुटुंब त्यांची मायदेशी वाट बघत आहे. लवकरात लवकर त्यांना परत आणा, त्यांची काळजी घ्या एवढीच विनंती आहे. कृपया लवकरात लवकर मार्ग काढावा."
विशाखाच्या या व्हिडीओवर मराठी कलाकारांनी कमेंट करत तिला धीर दिला आहे. सुकन्या मोने यांनी लिहिले, 'काळजी करू नकोस... स्वामींच नामस्मरण चालू ठेव... आपण सगळ्या बाजूंनी प्रयत्न करूया. अभिनय सुखरूप घरी येईल.तू खंबीर रहा.' तर नेहा नचिकेतने कमेंट करत म्हणाली, 'ताई काळजी करू नकोस... अभिनय सुखरूप परत येईल... ' विशाखाला सध्या सगळेच धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अभिनय लवकर परत येईल असा विश्वास व्यक्त करत आहेत.