"कुठलीही भीती नाही, कुणी पॅनिक नाही..."; दुबईत एन्जॉय करतेय अभिनेत्री, सांगितली सगळी परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 10:48 IST2026-03-02T10:48:24+5:302026-03-02T10:48:49+5:30
यूएई सरकार ज्याप्रकारे इथली परिस्थिती शांततापूर्वक हाताळत आहे त्याचे कौतुकही या सेलिब्रिटी जोडप्याने केले.

"कुठलीही भीती नाही, कुणी पॅनिक नाही..."; दुबईत एन्जॉय करतेय अभिनेत्री, सांगितली सगळी परिस्थिती
दुबई - अमेरिका इस्रायलनेइराणवर केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेत परिस्थिती बिघडली आहे. इराणकडूनइस्रायलसोबतदुबई, अबुधाबीतही सातत्याने हल्ले केले जात आहेत. युद्धामुळे हवाई वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे UAE मध्ये सामान्य पर्यटकांसोबतच अनेक सेलिब्रिटीही अडकले आहेत. त्यात बिग बॉस स्पर्धेत सहभागी जोडपे रोशेल राव आणि कीथ सिकेरा दुबईत अडकून राहिले आहेत. दुबईतील परिस्थितीबाबत रोशेलने तिच्या सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे.
दुबईत सध्या परिस्थिती काय?
अभिनेत्री आणि मॉडेल रोशेल रावने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने पती आणि मुलांसह दुबईत असल्याचे सांगितले. हे सर्व जण सुरक्षित आहेत. रोशेल आणि कीथ यांनी सांगितले की, दुबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. कुठलीही भीती नाही, कुणी पॅनिक नाही. मी कुटुंबासह एका रेस्टॉरंटला लंच एन्जॉय करायला आली आहे. यूएई सरकार ज्याप्रकारे इथली परिस्थिती शांततापूर्वक हाताळत आहे त्याचे कौतुकही या सेलिब्रिटी जोडप्याने केले.
आम्ही मागील काही दिवसांपासून दुबईत आहोत. तुमच्या सगळ्यांचे अनेक मेसेज आम्हाला मिळाले. त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करत तुम्हाला परिस्थिती सांगतोय. आम्ही सगळे ठीक आहोत. दुबईत आमचे खूप चांगले मित्र आहेत. ज्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला साथ दिली. यूएई सरकार परिस्थिती सांभाळत आहे. त्यांच्या कामामुळे आम्ही प्रेरित आहोत. पर्यटकांमध्ये भीतीदायक वातावरण नाही. आम्ही आता जेवायला आलो आहोत. सर्व काही शांत आहे. सामान्य परिस्थिती आहे. परंतु सर्व सुरळीत कधी होईल याची चर्चा लोकांमध्ये आहे असं रोशेल रावने सांगितले.
दरम्यान, एअरपोर्टवर गोंधळाची स्थिती आहे. लोक आपापल्या देशात जाण्यासाठी चिंतेत आहेत. आम्हीही काही दिवसांनी परत येऊ. पुढील काही दिवसांत सर्व सुरळीत होईल आणि आम्ही सुरक्षितपणे घरी परतू असा आम्हाला विश्वास आहे असंही या जोडप्याने म्हटलं. रोशेल आणि कीथ हे दोघेही बिग बॉसच्या सीजन ९ मध्ये एकत्र स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्यानंतर दोघांनी डेटिंगनंतर २०१८ साली लग्न केले. २०२३ साली या जोडप्याने एका मुलीला जन्म दिला होता. रोशेल ही अभिनेत्री आणि एक मॉडेल आहे.