मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
By कोमल खांबे | Updated: May 15, 2026 13:24 IST2026-05-15T13:18:51+5:302026-05-15T13:24:19+5:30
'देऊळ बंद २'साठी मोहन जोशींनी नकार दिला होता. त्यांना पॅरालिसिस झाल्याने या सिनेमासाठी ते तयार नव्हते. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडेंनी याचा खुलासा केला.

प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद'चा सीक्वल 'देऊळ बंद २' २१ मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देऊळ बंदमध्ये स्वामी समर्थांच्या भूमिकेत मोहन जोशी यांना प्रेक्षकांनी पसंत केलं.

पण, देऊळ बंद २साठी मोहन जोशींनी नकार दिला होता. त्यांना पॅरालिसिस झाल्याने या सिनेमासाठी ते तयार नव्हते. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडेंनी याचा खुलासा केला.

प्रवीण तरडे म्हणाले, "'देऊळ बंद २' सिनेमाच्या वेळी मोहन जोशी आजारी होते. त्यांनी स्वामी समर्थांच्या भूमिकेसाठी नकार दिला होता. "मी अभिनय बंद केलाय असं समज", असं ते म्हणाले.

मी त्यांना विचारलं की तुम्ही सांगा की मी किती वर्ष थांबू. कारण, स्वामी समर्थांच्या भूमिकेत तुमच्याशिवाय लोक आता कुणालाच बघू शकणार नाहीत. मला तुम्हीच हवे आहात.

त्यांनी माझ्याकडे थोडा वेळ मागितला. त्यांना पॅरालिसीस झाला होता. त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांना चालताही येत नव्हतं. ते दोनच पावलं चालू शकत होते.

"दीड वर्ष त्यांनी या भूमिकेसाठी अथक प्रयत्न केले. तोंडात पेन्सिल ठेवून त्यांनी बोलण्याचा सराव केला. ते बोलू लागले, चालू लागले".

तुम्ही सिनेमा बघून सांगावं की खरंच आपल्या मोहन जोशींना असं काही झालं होतं का? कुठल्याही पॅरालिसीस झालेल्या माणसाने देऊळ बंद बघा. जर मोहन जोशी करू शकतात तर कुणीही काहीही करू शकतं.

















