"लग्नानंतर मुलांना जन्म नको, त्यापेक्षा कुत्रा पाळा" शेफाली शाहचं मोठं वक्तव्य, तरुण मुलींना दिला 'हा' सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 18:07 IST2026-05-16T17:57:17+5:302026-05-16T18:07:01+5:30
अभिनेत्री शेफाली शाहने तरुण मुलींना घाईघाईत लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच मुलांऐवजी कुत्रे पाळण्याबाबत तिने केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री शेफाली शाह (Shefali Shah) ही नेहमीच तिच्या दर्जेदार अभिनयासोबतच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.

प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आणि कॉमेडियन लिली सिंग हिच्याशी संवाद साधताना शेफालीनं लग्न, नाती आणि पालकत्व यावर तिची रोखठोक मते मांडली.

लग्न आणि कुटुंबियांच्या दबावाखाली येऊन घाईघाईत निर्णय घेणाऱ्या आजच्या तरुणांना, विशेषतः तरुण मुलींना तिने एक मोलाचा सल्ला दिला.

नातेसंबंधांवर बोलताना शेफाली म्हणाली की, तरुण मुलींनी आयुष्यात खूप लवकर लग्नाचा निर्णय घेऊ नये.

शेफालीने सांगितले, "तुम्ही खूप लहान असताना लग्नाचा निर्णय घेऊ नका. त्या वयात तुम्हाला स्वतःबद्दल, तुमच्या आवडी-निवडींबद्दल पूर्ण माहितीही नसते. त्यामुळे आधी धीर धरा, लोकांना भेटा, त्यांना चांगल्या प्रकारे ओळखा आणि मगच निर्णय घ्या".

लग्न संस्थेवर भाष्य करताना शेफाली म्हणाली, "जर तुमचा लग्नावर विश्वास नसेल, तर कृपया लग्न करू नका. कारण लग्न टिकवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. लग्न केल्यानंतर नंतर माघार घेणे योग्य नाही. हा निर्णय घेण्याइतपत तुम्ही भावनिकदृष्ट्या परिपक्व असायला हवे".

या मुलाखतीदरम्यान जेव्हा होस्ट लिली सिंगनं सांगितलं की, ती ३७ वर्षांची आहे आणि तिनं अजून लग्न केलेलं नाही. यावर प्रतिक्रिया देताना शेफाली हसून म्हणाली, मी आता जे बोलणार आहे, त्यावरून मला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जाईल, मला माहित आहे. पण मी सांगेन की, मुलं जन्माला घालू नका, त्याऐवजी कुत्रे पाळा. फक्त कुत्रे पाळा".

पुढे आपल्या या विधानाचं समर्थन करताना शेफाली म्हणाली की, "मानवी जीवनात जर कुठून 'निःस्वार्थी मिळत असेल, तर ते फक्त पाळीव कुत्र्यांकडूनच मिळू शकतं".

दरम्यान, शेफाली शाहचे पहिले लग्न टेलिव्हिजन अभिनेता हर्ष छायासोबत झाले होते, परंतु ४ वर्षांनंतर ते वेगळे झाले. त्यानंतर २००० मध्ये तिने चित्रपट निर्माता विपुल अमृतलाल शाह यांच्याशी लग्न केले. त्यांना आर्यमन आणि मौर्य नावाचे दोन मुले आहेत.

एक यशस्वी अभिनेत्री आणि आई असण्यासोबतच शेफाली एक मोठी प्राणीप्रेमी (Animal Lover) आहे. तिच्याकडे 'अॅश' आणि 'सिम्बा' नावाचे दोन सुंदर सायबेरियन हस्की (Siberian Husky) कुत्रे आहेत. ती अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

















