"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:33 IST2026-04-16T09:32:50+5:302026-04-16T09:33:49+5:30
मला सिनेमाकडून ही अपेक्षा नव्हती, माझा विश्वास डगमगला..., नक्की काय म्हणाली मृणाल ठाकूर?

"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
मृणाल ठाकुर सध्या बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचे एकामागोमाग एक सिनेमे रिलीज होत आहेत. नुकताच तिचा 'डकैत' सिनेमा आला जो चर्चेत आहे. यातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय. तर याआधी ती अजय देवगणसोबत 'सन ऑफ सरदार २'मध्ये दिसली. मात्र या सिनेमात मृणालचे अनेक सीन्स कापण्यात आले ज्यामुळे ती खूप निराश झाली असा खुलासा तिने केला आहे. तसंच पतीच्या भूमिकेत तिच्याहून वयाने मोठा कलाकार असेल हेही तिला आधी सांगण्यात आलं नव्हतं असंही ती म्हणाली.
पत्रकार प्रेमा यांना दिलेल्या मुलाखतीत मृणाल ठाकूर म्हणाली, "मला सन ऑफ सरदारची संपूर्ण टीम खूप आवडते. ते मला कुटुंबासारखेच आहेत. पण एडिटिंग टेबलवर माझे २ महत्वाचे सीन्स कापण्यात येतील हे मला माहित नव्हतं. सिनेमात रोशनी ही माझ्या बहिणीची मुलगी असते. माझ्या बहिणीचं निधन झालेलं असतं. रोशनसाठी मी माझ्या वैयक्तिक आयुष्याचा त्याग करते असा एक आमचा खूप भावनिक सीन होता. त्यात रोशनी म्हणते मला आई नाही हे बरंच झालं कारण मला तू आहेस. प्रत्येकीला तुझ्यासारखी आई मिळो अशी मी प्रार्थना करते. तू मला भलेही जन्म दिला नाहीस पण तू मला सांभाळलं आहेस असा एक सुंदर दृष्टिकोन देणारा तो सीन होता."
ती पुढे म्हणाली, "तसंच मला माहित नव्हतं की एक सीनिअर कलाकार माझ्या नवऱ्याच्या भूमिकेत असणार आहे. मी यासाठी सिनेमाला होकार दिला नव्हता. मला हे अपेक्षितच नव्हतं. तिथे माझा विश्वास डगमगला. मात्र मला याचं वाईट वाटत नाही. कारण मला यातून शिकायला मिळालं. यश-अपयश, हिट-फ्लॉप येतच राहणार आहेत. स्क्रिप्ट वाचून जर हा सिनेमा हिटच होणार आहे हे माहित असतं तर सगळ्यांनीच हिट दिले असते."
मृणाल ठाकूरचा 'डकैत' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. मात्र 'धुरंधर'च्या वादळामुळे 'डकैत'वरही परिणाम झाला आहे. सिनेमात मृणाल ठाकूरसोबत अदिवि शेष, अनुराग कश्यप यांचीही भूमिका आहे.