कॅन्सर झाल्याचं आईवडिलांपासून महिनाभर लपवलं, राजश्री देशपांडेच्या डोळ्यात पाणी; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:24 IST2026-05-04T15:22:53+5:302026-05-04T15:24:57+5:30
कॅन्सरबद्दल सांगताना राजश्रीच्या डोळ्यात पाणी

कॅन्सर झाल्याचं आईवडिलांपासून महिनाभर लपवलं, राजश्री देशपांडेच्या डोळ्यात पाणी; म्हणाली...
मराठी अभिनेत्री राजश्री देशपांडे 'सॅक्रेड गेम्स'मध्ये दिसली होती. गेल्या काही काळात तिने अनेक मराठी, हिंदी प्रोजेक्ट्स केले. सध्या ती 'बाप्या' या आगामी मराठी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी राजश्रीने सोशल मीडियावर धक्कादायक खुलासा केला. तिने कॅन्सरशी झुंज दिल्याचं सांगत सर्जरीनंतरचे फोटो शेअर केले. राजश्रीने कॅन्सर झाल्याचं आईवडिलांना महिनाभर सांगितलंही नव्हतं. काय म्हणाली अभिनेत्री?
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत राजश्री देशपांडे म्हणाली, "हा एक असा आजार आहे जो दिसत नाही. तो शरिरात कधी येतो, कशामुळे येतो हे कळतच नाही. मला स्टेज १ ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. मी अगदी रुटीन चेकअपसाठी गेले होते. माझी मोठी बहीण जी डॉक्टर आहे तिच्यासोबत मी हॉस्पिटलमध्ये बसले होते. मी असंच चेकअपसाठी गेले होते. टेस्ट केल्यानंतर गाठ आहे हे कळलं. गाठ कोणती आहे ते तपासणं गरजेचं होतं. पण आईवडील आधीच आजारातून जात होते म्हणून मी बहिणीला म्हणाले की मुंबईला जाऊन मी पुढच्या टेस्ट करेन."
मुंबईत मी कोकिलाबेन रुग्णालयात मी बायोप्सी केली. मला सर्जरी करुन घ्या असं सांगण्यात आलं. हार्मोनल कॅन्सर झाला असल्याचं कळलं. नशिबाने कॅन्सर पसरला नव्हता. मग आम्ही सर्जरी प्लॅन केली. नंतर आणखी एक सर्जरीची गरज होती तीही केली. नंतर मी किमोच्या डॉक्टरांना भेटले. त्यांनी मला किमो करावं लागेल असं सांगितलं. नंतर मी रेडिएशन घेतलं. काही दिवस मी आईबाबांकडे गेले आणि मग पुन्हा मुंबईला जाऊन शूटिंग केलं. रेडिएशन घेऊन मला महिनाच झाला आहे."
आईवडिलांना महिनाभर काहीच माहित नव्हतं
राजश्री म्हणाली,"आईवडिलांसमोर ओपन व्हायला मला थोडा वेळ लागला. माझ्या बहिणी, माझ्या पार्टनरने माझी खूप साथ दिली. सर्जरी झाल्यानंतर मी ती सोशल मीडिया पोस्ट केली. मग मी माझ्या नेहमीच्या अगदी कॅज्युअल अंदाजाच आईला कॅन्सरबद्दल सांगितलं. डान्स वगैरे करत सांगितलं. तिला नक्कीच धक्का बसला आणि तो राहील. माझी सर्वात मोठी ताकदच गडबडली तर मी काय करु? त्यामुळे मला तिला पूर्ण वेळ तेवढंच स्ट्राँग बघायचं होतं. सर्जरी झाल्यानंतर जेव्हा मी तिला सांगितलं तेव्हाही मी अगदी हसत खेळत नाचत सांगितलं. अशा पद्धतीने मी आमच्यात संभाषण ठेवलं होतं. पण अवघड आहे. पहिल्या वेळी जेव्हा मी रेडिएशनला गेले तेव्हा माझ्यासोबत मित्रमंडळी होते. आपल्यासोबत मित्रपरिवार असणं खूप महत्वाचं असतं."