‘आई तारी तिला कोण मारी'; प्रार्थना बेहेरेच्या आगामी ‘मर्दिनी’चं पोस्टर रिलीज; काय आहे सिनेमात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:56 IST2026-05-04T15:56:23+5:302026-05-04T15:56:52+5:30
प्रार्थनाने शेअर केले 'मर्दिनी'चे पोस्टर, तिच्या भूमिकेबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता

‘आई तारी तिला कोण मारी'; प्रार्थना बेहेरेच्या आगामी ‘मर्दिनी’चं पोस्टर रिलीज; काय आहे सिनेमात?
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लवकरच एका इंटरेस्टिंग सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. 'मर्दिनी' असं सिनेमाचं नाव असून चित्रपटात एका आईचा संघर्ष, तिच्या कुटुंबासाठीची झुंज आणि परिस्थितीसमोर न झुकणारी तिची जिद्द यांचा भावनिक प्रवास पाहायला मिळणार आहे. आपल्या लेकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी एक सामान्य स्त्री कशी परिस्थितीशी दोन हात करते आणि वेळ आली तर 'मर्दिनी'सारखं सामर्थ्यवान रूप धारण करते, ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. आजच 'मर्दिनी'चं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत आशयप्रधान आणि सामाजिक विषय हाताळणाऱ्या चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आला आहे. अशाच प्रभावी कथानकासह आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे 'मर्दिनी'. चित्रपटाच्या पोस्टर लॉन्चचे अनावरण करण्यात आले असून, या निमित्ताने चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पोस्टरमधून समोर आलेली पहिली झलक आणि त्यावरील आशयपूर्ण कॅप्शनमुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे. नारीशक्ती, संघर्ष, आत्मसन्मान आणि आईच्या सामर्थ्याची कथा मांडणारा हा चित्रपट 3 जुलै 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
श्रेयस तळपदे प्रस्तुत,ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा.लि. आणि ओ.डी आय ग्रुप निर्मित 'मर्दिनी' हा चित्रपट केवळ स्त्रीशक्तीवर आधारित नसून, आईच्या भावविश्वाला केंद्रस्थानी ठेवणारी कथा असल्याचे समोर येत आहे. पोस्टरवरील "आई तारी तिला कोण मारी" म्हणजेच लेकरांसाठी आई ज्योतही पेटवते आणि राक्षसांसाठी चिताही... हे कॅप्शन चित्रपटाच्या आशयाची प्रभावी झलक देतं. आई ही फक्त प्रेम, माया आणि जपणुकीची प्रतिमा नसते, तर आपल्या लेकरांवर संकट आलं की ती कठोर आणि निर्भय रूप धारण करून त्यांचं रक्षण करण्यासाठी उभी राहते, ही भावना या कथानकातून प्रभावीपणे मांडली जाणार आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव देणारा ठरणार आहे.