Deool Band 2 Teaser: शेतकरी महिला घेणार स्वामींची परीक्षा, 'देऊळ बंद २'चा टीझर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 18:49 IST2026-05-07T18:48:33+5:302026-05-07T18:49:22+5:30
ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

Deool Band 2 Teaser: शेतकरी महिला घेणार स्वामींची परीक्षा, 'देऊळ बंद २'चा टीझर प्रदर्शित
२१ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘वटवृक्ष एंटरटेनमेंट’ निर्मित बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित "देऊळ बंद २" चा टीझर आज श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रदर्शित करण्यात आला. अनेक स्वामी भक्तांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला निर्माते आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
"देऊळ बंद २ - आता परीक्षा देवाची" च्या टीझरमघ्ये दिसतं की, आस्तिक शेतकऱ्याची नास्तिक पत्नी असणाऱ्या स्नेहल तरडेचा नवरा नवरा देऊळ बंद करून चावी घेऊन कुठेतरी निघून गेला आहे. ही तक्रार घेऊन ती स्वामींना बोलाविण्यासाठी अत्यंत रागाने वारुळावर दगड मारते आणि स्वामी प्रकट होतात. त्यानंतर स्वामींचा विविध वाहनातून प्रवास दाखवताना काही दिग्गज कलाकारांची झलक पाहायला मिळते.
पुढच्या प्रसंगात स्वामी म्हणतात "अगं ए नास्तिके प्रत्येक युगात तुझ्या सारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाहिलेत मी देवाची परीक्षा पाहणारे" त्यावर शेतकरी महिला म्हणते "लिहून देते, कधी शेतकरी नसल पाहिला." त्यांच्या या संवादावरून "देऊळ बंद २" मध्ये आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक गरीब शेतकरी महिला देवाची सुद्धा परीक्षा घेऊ शकते हे स्पष्ट होत आहे.
शेवटच्या प्रसंगात स्नेहल तरडे स्वामींना परत जायला सांगतात. पण ''तू परीक्षेला बसवलं आहे ना? त्यामुळे परीक्षा दिल्या शिवाय मी जाणार नाही... आता परीक्षा देवाची'' असे म्हणत स्वामी जायला नकार देतात. आता या परीक्षेत स्वामी कोणत्या प्रश्नांना समोरे जाणार आणि शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्यांचे निवारण करणार? हे बघण्यासाठी प्रेक्षकांना २१ मे पर्यंत वाट बघावी लागणार आहे.
२१ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित "देऊळ बंद २" चे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले असून निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. चित्रपटात मोहन जोशी आणि स्नेहल तरडे प्रमुख भूमिकेत दिसणार असून महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, ओम भुतकर, संस्कृती बालगुडे, जगन्नाथ निवंगुणे, सुनील अभ्यंकर, अतुल कुडले आणि प्रविण तरडे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.