'धुरंधर ३' येणार का? सिनेमातील 'जमील जमाली' फेम राकेश बेदींचा खुलासा, म्हणाले- "कथेचा शेवट..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 10:51 IST2026-04-20T10:48:21+5:302026-04-20T10:51:40+5:30
राकेश बेदी यांनी 'धुरंधर'च्या सीक्वलबद्दल भाष्य केले आहे. यासोबतच चाहत्यांकडून होत असलेल्या 'धुरंधर ३'च्या मागणीवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

'धुरंधर ३' येणार का? सिनेमातील 'जमील जमाली' फेम राकेश बेदींचा खुलासा, म्हणाले- "कथेचा शेवट..."
सध्या 'धुरंधर २' चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. 'धुरंधर २' मध्ये सर्वात गाजलेलं पात्र म्हणजे जमील जमाली. अभिनेते राकेश बेदींनी ही भूमिका साकारली. अशातच एका मुलाखतीदरम्यान, राकेश बेदी यांनी 'धुरंधर'च्या सीक्वलबद्दल भाष्य केले आहे. यासोबतच चाहत्यांकडून होत असलेल्या 'धुरंधर ३'च्या मागणीवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
'धुरंधर ३' येणार का?
'धुरंधर २' च्या यशानंतर चाहत्यांनी निर्मात्यांकडे तिसरा भाग आणा, अशी विनंती करण्यास सुरुवात केली आहे. झूमशी बोलताना राकेश बेदी म्हणाले, "मला वाटत नाही की तिसरा भाग बनेल. मात्र, 'धुरंधर' ही एक फ्रँचायझी आहे आणि ती कधीही दुसऱ्या कलाकारांना घेऊन बनवता येऊ शकते. दुसऱ्या भागाच्या कथेचा शेवट अशा प्रकारे होतो की, तो गुप्तहेर आपल्या मायदेशात परततो."
जमील जमालीची भूमिका आणि ट्विस्ट
राकेश बेदी यांनी त्यांच्या 'जमील जमाली' या पात्राबद्दल आणि कथेतील त्या ट्विस्टबद्दल देखील चर्चा केली. 'धुरंधर २' च्या शेवटी कळतं की जमील जमाली हा पाकिस्तानमध्ये काम करणारा एक भारतीय गुप्तहेर आहे. आपल्या भूमिकेबद्दल सांगताना ते म्हणाले, "प्रेक्षकांसाठी हा एक मोठा धक्का होता, पण आमच्यासाठी तो फक्त एक सीन होता. आम्हाला माहित होते की याचा प्रभाव नक्कीच पडेल. 'धुरंधर भाग १' प्रचंड गाजल्यामुळे, प्रेक्षकांचा 'धुरंधर भाग २' पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता."
ते पुढे म्हणाले, "जेव्हा एखाद्या चित्रपटाता पहिला भाग सुपरहिट होतो, तेव्हा प्रेक्षक दुसरा भाग उत्तमच असेल या खात्रीने तो पाहायला जातात. लोकांनी धुरंधरच्या दुसऱ्या भागाला गृहीत धरलेलं नाही. दुसऱ्या भागात पुढे काय घडते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. त्यामुळेच आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत.", अशा शब्दांत राकेश बेदींनी 'धुरंधर' विषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.