पुढल्या वेळी छातीत गोळ्या घालू...; बिश्नोई गँगची रोहित शेट्टीला धमकी; बॉलिवूडलाही 'वॉर्निंग', ५ संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 14:37 IST2026-02-01T14:34:39+5:302026-02-01T14:37:13+5:30
Rohit Shetty House Firing, Bishnoi Gang Shubham Lonkar, 5 detained: पुण्यातून ५ जण अटकेत, मुंबई पोलिसांकडे ताबा देणार

पुढल्या वेळी छातीत गोळ्या घालू...; बिश्नोई गँगची रोहित शेट्टीला धमकी; बॉलिवूडलाही 'वॉर्निंग', ५ संशयित ताब्यात
Rohit Shetty House Firing, Bishnoi Gang Shubham Lonkar, 5 detained: प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्यामुंबईतील घराबाहेर रविवारी मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिस जुहू येथील घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण परिसराला घेराव घातला. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पहाटे ३ वाजता अज्ञात हल्लेखोरांनी रोहित शेट्टी यांच्या घरावर चार गोळ्या झाडल्या. घटनेचा तपास सुरू आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेला शुभम लोणकर याने रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
संशयितांना पुण्यात अटक, मुंबईला रवानगी
२०२५ मध्ये सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर बॉलिवूड हादरले होते. त्यानंतर काल पुन्हा एकदा असा प्रकार घडून आला. त्यात पुणे पोलिसांनी चार ते पाच जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. पुण्यातील वारजे, कर्वेनगर परिसरातून या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित चार जण शुभम लोणकर गँगशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे, मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पुणे पोलिस या संशयितांना मुंबई गुन्हे शाखेला सोपवणार असल्याचेही सांगितले जात आहे.
पुढल्या वेळी छातीत गोळी घालू...
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी आणि गँगस्टर शुभम लोणकर याने रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याने रोहित शेट्टी आणि संपूर्ण बॉलीवूडला गंभीर परिणामांची धमकी दिली आहे. शुभम लोणकर, आरझू बिश्नोई, हरी बॉक्सर आणि हरमन संधू यांच्या नावाने ही पोस्ट करण्यात आली आहे. "रोहित शेट्टीच्या घरावर (शेट्टी टॉवर) आज जो गोळीबार झाला, त्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. हा फक्त ट्रेलर आहे. आम्ही त्याला अनेकदा निरोप धाडले होते की आमच्या कामात ढवळाढवळ करू नकोस, पण त्याला समजले नाही. हा फक्त एक छोटासा ट्रेलर आहे. जर तो सुधारला नाही, तर पुढची गोळी त्याच्या घराबाहेर नाही, तर त्याच्या बेडरूममध्ये थेट त्याच्या छातीवर घालू. आम्ही तुझी अवस्था बाबा सिद्दिकींपेक्षाही वाईट करू," असा थेट इशारा गँगस्टरने दिला आहे.

या पोस्टच्या माध्यमातून संपूर्ण बॉलीवूडलाही तंबी देण्यात आली आहे. "अद्यापही वेळ गेलेली नाही, वेळ आहे तोवर सुधारा, अन्यथा सर्वांची अवस्था खूप वाईट होईल," अशी धमकी देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये विशेष टीप लिहून असे सांगण्यात आले आहे की, "लॉरेन्स बिश्नोई हा एकमेव ग्रुप होता, आहे आणि राहील." यावरून हा गोळीबार बिश्नोई गँगच्या इशाऱ्यावरूनच झाल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, रोहित शेट्टी आणि त्याच्या कुटूंबाकडून कोणतेही विधान आलेले नाही. त्यामुळे रोहितच्या अधिकृत निवेदनाचीही बरेचजण वाट पाहत आहेत.