राकेश बेदींना करायचं नव्हतं आदित्य धरसोबत काम; 'या' व्यक्तीमुळे स्वीकारला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 11:20 IST2026-04-21T11:20:02+5:302026-04-21T11:20:39+5:30
Rakesh bedi: अलिकडेच त्यांनी फराह खानसोबत बोलत असतांना आदित्य धरसोबत काम करण्यास नकार का दिला होता हे सांगितलं.

राकेश बेदींना करायचं नव्हतं आदित्य धरसोबत काम; 'या' व्यक्तीमुळे स्वीकारला सिनेमा
'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' हे दोन्ही सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. यात अभिनेता रणवीर सिंहसह अन्यही काही भूमिका आहेत ज्या लोकप्रिय ठरल्या. त्यातलीच एक भूमिका म्हणजे अभिनेता राकेश बेदी यांनी साकारलेली जमील जमाली. या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. इतकंच नाही तर त्यांचे डायलॉग्सही तुफान व्हायरल झाले. परंतु, तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? राकेश बेदी यांना दिग्दर्शक आदित्य धर यांच्यासोबत काम करायचं नव्हतं. अलिकडेच त्यांनी फराह खानला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयीचा खुलासा केला.
अलिकडेच त्यांनी फराह खानसोबत बोलत असतांना आदित्य धरसोबत काम करण्यास नकार का दिला होता हे सांगितलं. तसंच त्यांच्याच कुटुंबातील एका खास व्यक्तीमुळे त्यांनी आदित्यसोबत काम करण्यास तयार झाल्याचंही सांगितलं.
आदित्यसोबत काम करायची राकेश बेदी यांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी २०१९ मध्ये आलेल्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमात सर्बिया ही भूमिका साकारली होती. खरं पाहायला गेलं तर त्यांची भूमिका फार लहान होती. त्यांचा फक्त एकच सीन होता. त्यामुळे त्यांनी या सिनेमासाठी नकार दिला होता. मात्र, लेकीच्या सांगण्यावरुन ते हा सिनेमा करण्यास तयार झाले.
''ज्यावेळी आदित्यने मला उरी सिनेमाची ऑफर दिली त्यावेळी मी थेट नकार दिला होता. कारण, त्या सिनेमात सर्बियाचा फक्त एकच सीन होता. मात्र, माझ्या मुलीने माझी समजूत काढली. 'पापा, ते नवीन दिग्दर्शक असले तरीदेखील हरहुन्नरी आहेत. त्यामुळे प्लीज हा सिनेमा करा', असं माझी मुलगी म्हणाली. आणि, तिच्या या होकारामध्ये माझ्या पत्नीनेही होकार मिळवला. ज्यामुळे मी हा सिनेमा करायचा निर्णय घेतला. आणि, जर सिनिअर कलाकारच नवोदित दिग्दर्शकांसोबत काम करायला नकार देऊ लागले तर हे योग्य नाही'', असं राकेश बेदी म्हणाले.
दरम्यान, ज्यावेळी 'धुरंधर २' रिलीज झाला. त्याच्यानंतर प्रेक्षकांनी 'धुरंधर'मधील आणि 'उरी'मधील त्यांच्या भूमिकांमधील कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची ही भूमिका पुन्हा चर्चेत आली. 'उरी'मध्ये राकेश बेदी यांनी आयएसआय एजेंटची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या भूमिकेचं कनेक्शन 'धुरंधर'मधील जमील जमालीशी जोडलं गेलं. ज्यांनी पाकिस्तानात राहून भारतासाठी काम केलं.