"मला हे मान्य नाही, तुझी निवृत्ती मागे घे..."; प्रसिद्ध दिग्दर्शकाने केली अरिजीत सिंहला विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 09:15 IST2026-01-31T09:14:29+5:302026-01-31T09:15:46+5:30
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने प्लेबॅक सिंगिंगमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्याने संपूर्ण संगीत विश्वात खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर त्याचे चाहते आणि सहकलाकार प्रचंड निराश झाले आहेत.

"मला हे मान्य नाही, तुझी निवृत्ती मागे घे..."; प्रसिद्ध दिग्दर्शकाने केली अरिजीत सिंहला विनंती
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने प्लेबॅक सिंगिंगमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्याने संपूर्ण संगीत विश्वात खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर त्याचे चाहते आणि सहकलाकार प्रचंड निराश झाले असून, आता प्रसिद्ध संगीतकार आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी अरिजीतला आपला निर्णय मागे घेण्याची कळकळीची विनंती केली आहे.
विशाल भारद्वाज यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते आपल्या आगामी 'ओ रोमियो' या चित्रपटातील एका गाण्याच्या ओळी गुणगुणताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत त्यांनी एक भावूक कॅप्शन लिहिले आहे. "अरे अरिजीत... काही दिवसांपूर्वी जेव्हा आपण या गाण्यावर एकत्र काम करत होतो, तेव्हा मला कल्पनाही नव्हती की, तुझ्यासोबतचे मी माझ्या शेवटच्या चित्रपट गाण्यासाठी काम करतोय. हे खूप अन्यायकारक आहे आणि मला हे अजिबात मान्य नाही. तुझा संन्यास तू मागे घे," असं त्यांनी म्हटले आहे.
अरिजीत सिंहने २८ जानेवारी २०२६ रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्तीची घोषणा केली होती. चित्रपट संगीताला निरोप दिला असला तरी, त्याने स्पष्ट केले आहे की तो संगीत क्षेत्राशी जोडलेला राहील. अरिजीत आता लाईव्ह कॉन्सर्ट्सवर लक्ष केंद्रित करणार असल्याची शक्यता आहे. अर्थात याबाबत अद्याप काहीच निश्चित नाही.
विशाल भारद्वाज यांच्या 'ओ रोमियो' या चित्रपटात अरिजीतने गायलेले 'हम तो तेरे ही लिए थे' हे गाणे सध्या प्रचंड गाजत आहे. अरिजीतसारख्या दिग्गज गायकाने इतक्या लवकर चित्रपट सृष्टीतून निवृत्त होणे हे भारतीय संगीत क्षेत्रासाठी मोठे नुकसान असल्याचे बोलले जात आहे. आता विशाल भारद्वाज यांच्या विनंतीनंतर अरिजीत आपला निर्णय बदलतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.