लक्ष्य लालवानीचं कमबॅक, पण राघवचं काय? 'किल २'च्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 17:58 IST2026-04-27T17:57:04+5:302026-04-27T17:58:04+5:30

'किल २'बद्दल महत्वाची माहिती समोर

lakshya lalwani and raghav juyal starrer kill sequel kill 2 announced know more | लक्ष्य लालवानीचं कमबॅक, पण राघवचं काय? 'किल २'च्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

लक्ष्य लालवानीचं कमबॅक, पण राघवचं काय? 'किल २'च्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

२०२४ मध्ये प्रदर्शित झालेला आणि बॉलीवूडमधील आतापर्यंतचा सर्वात हिंसक (Violent) चित्रपट मानला गेलेला 'किल' (Kill) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राघव जुयाल आणि लक्ष्य लालवानी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने आपल्या थरारक ॲक्शनने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले होते. ४ जुलै २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर आता निर्मात्यांनी याच्या सीक्वलची घोषणा केली असून, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'किल' चित्रपटाने अभिनेता लक्ष्य लालवानीला एक नवी ओळख मिळवून दिली, तर राघव जुयालने खलनायकाच्या भूमिकेतून सर्वांची वाहवा मिळवली होती. आता 'किल २' येणार असल्याचे निश्चित झाले असून यावर कामही सुरू झाले आहे. या सीक्वलमध्ये लक्ष्य पुन्हा एकदा 'एनएसजी कमांडो' अमृत राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, यावेळी चित्रपटाची कथा आणि पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी आणि टाईमलाईननुसार असणार आहे.

'व्हरायटी इंडिया'च्या रिपोर्टनुसार, धर्मा प्रोडक्शन्स आणि सिखिया एंटरटेनमेंटने या चित्रपटाची कथा फायनल केली असून, या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापासून चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्याची तयारी सुरू आहे. पहिल्या भागात लक्ष्यच्या अमृत राठोड या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते, त्यामुळे दुसऱ्या भागात तो नक्की काय धमाका करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एक महत्त्वाची बातमी म्हणजे, 'किल २' चे दिग्दर्शन निखिल नागेश भट्ट करणार नाहीत. पहिल्या भागाचे यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या निखिल यांनी या प्रोजेक्टमधून माघार घेतली आहे. सध्या ते सनी देओलच्या आगामी 'परशुराम' (कामकाऊ नाव) या चित्रपटात व्यग्र असल्यामुळे, 'किल २' च्या दिग्दर्शनाची धुरा दुसऱ्या एखाद्या निष्णात दिग्दर्शकाकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.

व्यावसायिक गणितांचा विचार केला तर, 'किल' हा चित्रपट केवळ २० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपल्या बजेटच्या दुप्पट म्हणजेच जगभरात सुमारे ४८ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाला IMDb वर ७.४ रेटिंग मिळाले असून, सध्या तो 'जिओ सिनेमा' (हॉटस्टार) वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

या सीक्वलमध्ये लक्ष्य लालवानी तर निश्चित झाला आहे, पण राघव जुयालसारखा तगडा खलनायक पुन्हा पाहायला मिळणार की एखादा नवीन चेहरा समोर येणार, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. एकूणच, बॉलीवूडचा हा सर्वात 'हिंसक' सिनेमा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रक्तपात आणि थरार घडवण्यासाठी सज्ज झाला आहे.

Web Title: lakshya lalwani and raghav juyal starrer kill sequel kill 2 announced know more