'आई-वडिलांनीच माझं मन दुखावल होतं..'; 'धुरंधर'फेम गायिकेला लागलं होतं दारुचं व्यसन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 11:23 IST2026-04-21T11:22:57+5:302026-04-21T11:23:44+5:30
Jasmine sandlas: जास्मिनने नुकतीच रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या दारुच्या व्यसनाविषयी आणि आई-वडिलांनी दिलेल्या वागणुकीवर भाष्य केलं.

'आई-वडिलांनीच माझं मन दुखावल होतं..'; 'धुरंधर'फेम गायिकेला लागलं होतं दारुचं व्यसन
आदित्य धर यांचा 'धुरंधर' हा सिनेमा सगळीकडे सध्या चांगलाच गाजतोय. सिनेमाचं कथानक, त्यातील कलाकारांचा अभिनय यांच्यासोबतच त्यातील गाणीदेखील बरीच लोकप्रिय झाली. यात खासकरुन धुरंधरचं शीर्षक गीत आणि शरारत ही गाणं तर सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झालं. हे गाणं पंजाबी गायिका जास्मिन सँडलस हिने गायलं असून या गाण्यामुळे ती रातोरात प्रकाशझोतात आली. अलिकडेच जास्मिनने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यामधील अनेक खुलासे केले.
जास्मिनने नुकतीच रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या दारुच्या व्यसनाविषयी आणि आई-वडिलांनी दिलेल्या वागणुकीवर भाष्य केलं. मला आयुष्यात खूप स्ट्रगल करावा लागला. मोठी होत असतांना मला आयुष्यात अनेक चढउतारांमधून जावं लागलं. मी प्रत्येक गोष्ट त्यावेळी समजून घेत होते. पण, हा प्रवास माझ्यासाठी खरंच सुखकर नव्हता. ज्यावेळी तुमच्या आयुष्यात असे चढउतार येतात त्यावेळी तुमच्या पालकांनी तुमच्यासोबत असणं फार गरजेचं असतं. त्यावेळी मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. मात्र, पालक अशा परिस्थितीमध्ये कठोरपणे कसं काय वागू शकतात? ज्यावेळी तुमच्या आयुष्यात चढउतार येतात त्यावेळी तुम्ही आधार शोधायचा प्रयत्न करता. त्या २-३ वर्षात मी ज्या चूका केल्या, जे दारुचं व्यसन मला जडलं त्या सगळ्या गोष्टींचा मला पश्चाताप आहेच'', असं जास्मीन म्हणाली.
पुढे ती म्हणते, ''लहान असतांना माझ्याच आई-वडिलांनी कित्येकदा माझं मन दुखावलं आहे. नकळतपणे त्यांनी मला दुखावलं ज्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी कटूता निर्माण झाली. माझं त्यांच्यावर प्रेम आहे. पण, ज्यावेळी एखाद्या लहान मुलाचं मन दुखावतं त्यावेळी तो कोलमडून पडतो. जेव्हा तुमच्याकडे हा सगळा त्रास सोडून कुठेही पळून जायचा मार्ग नसतो ना. त्यावेळी तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आधार शोधायचा प्रयत्न करता. मी संपूर्ण आयुष्य हेच करत आले. फक्त घुसमटत राहिले आणि आधार शोधत बसले.''
दरम्यान, मूळची जालंधरची असलेल्या जास्मीनचं बालपण कॅलिफोर्नियामध्ये गेले. २००८ मध्ये तिने मुस्कान या गाण्यातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर तिला खरी ओळख 2014 मध्ये किक या सिनेमामुळे मिळाली.या सिनेमातलं 'यार ना मिले' हे गाणं तिने लिहिलं आणि गायलं. धुरंधरमध्ये तिने सिनेमाचं शीर्षक गीत, शरारत,आरी आरी, में और तू, आखरी इष्क, रंग दे लाल, जाईये सजना ही गाणी गायली आहेत.