वाढत्या प्रदूषणावरून अक्षय कुमारचा मुंबईकरांना सल्ला, नोरा-संजय दत्तच्या गाण्याबाबत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:59 IST2026-03-20T13:58:46+5:302026-03-20T13:59:30+5:30
अक्षय कुमारनं मुंबईच्या खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेवर थेट मत मांडलं! संजय दत्त-नोराच्या अश्लील गाण्याबाबत म्हणाला...

वाढत्या प्रदूषणावरून अक्षय कुमारचा मुंबईकरांना सल्ला, नोरा-संजय दत्तच्या गाण्याबाबत म्हणाला...
बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमीच आपल्या शिस्तीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो. मंगळवारी अक्षयने मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) 'मुंबई क्लीन लीग' (Mumbai Clean League) कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात स्वच्छतेवर बोलताना अक्षयने सध्या चर्चेत असलेल्या संजय दत्त आणि नोरा फतेही यांच्या 'सरके चुनर तेरी' या गाण्यावर आणि मुंबईच्या खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेवर (AQI) आपली रोखठोक मते मांडली.
अक्षयला यावेळी कार्यक्रमादरम्यान नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्या 'सरके चुनर तेरी' या वादग्रस्त गाण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, "हा बीएमसीशी संबंधित विषय नाही. जर बॉलिवूड स्वच्छ करणं बीएमसीचं काम असतं, तर मी त्यांना नक्कीच साफसफाई करण्यास सांगितलं असतं".
मुंबईतील वाढत्या AQI बाबत विचारलं असता, त्यानं सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला, "प्रत्येक ठिकाणी काही चांगलं आणि काही वाईट असतं. प्रत्येक गोष्टीत चुका शोधू नका. एका खोलीत अनेक दिवे असतात, त्यातील एक बंद असेल तर फक्त त्याच्याकडे लक्ष देऊ नका".
आगामी चित्रपट
अक्षय कुमार लवकरच दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या 'भूत बंगला' या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहेत. या कार्यक्रमाला तो थेट शूटिंगमधूनच वेळ काढून पोहोचला होता. स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या विषयावर बोलताना त्यानं सांगितलं की, "मी आज शूटिंगमधून वेळ काढून इथे आलो, कारण स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला सकारात्मक विचारसरणीसह पुढे जायला हवं".