खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 08:25 IST2026-04-23T08:23:37+5:302026-04-23T08:25:13+5:30
Divyanka Sirohi Death Case: कुटुंबीय घरी आले तर तिचा मृतदेह पडलेला आढळला

खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
Divyanka Sirohi Death Case: सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर, हरयाणवी इंडस्ट्रीतील मॉडेल-अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी धक्कादायक निधन झाले. मंगळवारी तिने अखेरचा श्वास घेतला. दिव्यांकाची मोठी बहीण आरतीने इंस्टाग्रामवरील एका पोस्टद्वारे आपल्या बहिणीच्या निधनाची बातमी दिली. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे, "अत्यंत दुःखाने मी तुम्हाला कळवू इच्छिते की, माझी धाकटी बहीण दिव्यांका हिचे २१ एप्रिलला निधन झाले. तिच्या आत्म्यास शांती लाभो."

दिव्यांकाच्या निधनाने चाहते दुःखी
मिळालेल्या वृत्तानुसार, गाझियाबादमधील राजनगर एक्सटेंशन येथील तिच्या घरी दिव्यांकाची प्रकृती अचानक खालावली आणि ती बेशुद्ध होऊन कोसळली. बुधवारी सकाळी तिच्या मूळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत कुटुंबीयांनी सांगितले की, मंगळवारी दिव्यांकाची प्रकृती सामान्य होती. तिने आपल्या भावासाठी जेवणही बनवले होते. मात्र, तिची प्रकृती थोडी बिघडल्याचे तिने सांगितले होते. दरम्यान, तिचा भाऊ काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेला होता. जाताना त्याने तिला गेट बंद करायला मेसेज केला, ज्यावर दिव्यांकाने "ओके" असे उत्तर दिले. मात्र, जेव्हा कुटुंबीय परत आले, तेव्हा दिव्यांका मृतावस्थेत आढळली.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तिचे शरीर कडक झाले होते आणि त्यावर थोडी सूज होती. तिच्या अचानक मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक संशयानुसार, हे हृदयविकाराच्या झटक्याने झाले असावे. तथापि, मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. दिव्यांकाच्या मृत्यूच्या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ही अभिनेत्री फक्त ३० वर्षांची होती. इतक्या तरुण वयात दिव्यांकाचे अचानक जाणे धक्कादायक आहे. हरियाणवी इंडस्ट्रीतील चाहते आणि कलाकारांनी तिच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. प्रत्येकजण डोळ्यात अश्रू आणून अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहत आहे. दिव्यांकाचे इंस्टाग्रामवर १३ लाख फॉलोअर्स होते.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, दिव्यांकाचा जन्म १९ नोव्हेंबर १९९६ रोजी बुलंदशहर येथे झाला होता. तिचे मूळ गावही बुलंदशहरमध्येच आहे. ती सध्या गाझियाबादमधील राजनगर एक्सटेंशन येथील एका सोसायटीमध्ये तिच्या भावा-बहिणीसोबत राहत होती. दिव्यांकाने मेरठ येथील चौधरी चरण सिंग विद्यापीठातून बीसीए पूर्ण केले आणि त्यानंतर सिक्कीममधून एमबीएची पदवी मिळवली. एका मुलाखतीत दिव्यांकाने सांगितले की, तिला लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. ती टिकटॉक व्हिडिओ बनवत असे. तिने सुनंदा शर्मा यांच्या 'मेरी मम्मी नु पसंद नी तू' या गाण्यावर निळ्या रंगाचा सूट घालून एक व्हिडिओ बनवला होता. तिच्या अप्रतिम हावभावांमुळे तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. त्या व्हिडिओला २ कोटी व्ह्यूज मिळाले होते. दिव्यांकाने अनेक हरियाणवी गाण्यांमध्ये काम केले होते. तिच्या पडद्यावरील उपस्थिती आणि भावपूर्ण अभिनयामुळे ती हरियाणवी इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाली. दिव्यांका अविवाहित होती.
अभिनेत्रीच्या निधनानंतर, तिची एक जुनी पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. ९ जून २०२३ रोजी दिव्यांकाने 'भगवान शिव, मला तुमच्यासोबत घेऊन जा' असे कॅप्शन देत एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. ती इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय होती. तिच्या मनमोहक हास्याने मोहित झालेले चाहते तिच्या निधनाच्या बातमीने हादरले आहेत. दिव्यांका आता या जगात नाही, यावर विश्वास ठेवणे त्यांना कठीण जात आहे. चाहते म्हणतात की दिव्यांका तिच्या गाण्यांमधून आणि व्हिडिओंमधून त्यांच्या हृदयात कायम जिवंत राहील. दिव्यांका सिरोहीला श्रद्धांजली!