महिलांना जोडीदारापेक्षा करियर महत्त्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 04:19 IST
एका सर्व्हेनुसार स्वातंत्र्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वत:चा आदर या गोष्टींमुळे महिलांचा प्राधान्यक्रम बदलला आहे.
महिलांना जोडीदारापेक्षा करियर महत्त्वाचे
एक काळ होता जेव्हा घराचा उंबारठा ओलांडणेदेखील महिलांना वर्ज्य होते. ‘चूल आणि मूल’ एवढेच तिचे आयुष्य आणि अस्तित्व.पण जसा जसा काळ बदलत गेला तशी समाजाची उन्नती होत गेली. केवळ भौतिकच नाही तर वैचारिक बदल घडून आले.महिला घराबाहेर पडून नोकरी करू लागल्या. पण तरीदेखील संसाराच्या जबाबदारीतून त्यांची पूर्ण सुटका झाली नव्हती. घरदार सांभाळूनच नोकरी करायची, अन्यथा नाही. मुलीदेखील शिक्षणानंतर करियरपेक्षा लग्न करण्यात धन्यता मानत असे.मात्र, आता परिस्थिती पूर्ण बदलेली आहे. चीनमध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार स्वातंत्र्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वत:चा आदर या गोष्टींमुळे महिलांचा प्राधान्यक्रम बदलला आहे. लग्न करून सासरी बसण्यापेक्षा त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणे अधिक पसंत आहे.स्वतंत्र आयुष्य जगण्याला महिलांना पाच पैकी 4.53 रेटिंग दिली. इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी आपल्या मनाचा कौल ऐकण्याला अधिक प्राधान्य देतान दिसत आहेत. करियर, स्वखूशी, स्वतंत्र आयुष्य असा आधुनिक नारीचा प्राधान्यक्रम आहे.